नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे नागेबाबा परिवाराचे वतीने आयोजित केलेल्या पसायदान चिंतन सोहळ्याची सुरुवात रविवार दि.१७ मे पासून सुरुवात होत असून गंगापूर येथील श्री विठ्ठल आश्रमाचे प्रमुख महंत गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत हे सात दिवस पसायदानावर निरूपण करणार आहेत अशी माहिती नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील नागेबाबा भक्त निवासाचे प्रांगणात रविवार दि.१७ मे ते शनिवार दि. २३ मे २०२६ या कालावधीमध्ये हा पसायदान चिंतन सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येणार आहे.
दररोज सकाळी पहाटे ५ ते सकाळी ७ काकडा आरती,सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व भजन संध्या, सकाळी ७ ते सायंकाळी ७ (महिला) नामरमरण चिंतन (प्रत्येकी २ तास),
सायंकाळी ७ ते सकाळी ७ (पुरुष) नामस्मरण चिंतन (प्रत्येकी २ तास) होणार आहे. तर दररोज संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत हे सात दिवस पसायदानावर निरूपण व त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.
रविवार दि.१७ रोजी सांयकाली
ह.भ.प राऊत महाराजांचे भेंडा गावात आगमन होताच त्यांची बसस्थानक चौक ते श्रीसंत नागेबाबा मंदिर अशी भव्य मिरवणूक होणार असून मिरवणूक मार्गावर सडा-रांगोळ्या, २०० मोटारसायकलचीं रॅली काढण्यात येणार आहे. विविध पारंपरिक वाद्य, माऊलींचे पैस खांब व भव्य ज्ञानेश्वरी देखावा, वेशभूषेतील निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताई, छत्रपती शिवाजी महाराज व झाशीची राणी याची मिरवणूक हे विशेष आकर्षण राहणार आहे. टाळ व मृदंगच्या निनादामध्ये भव्य अशी भक्तिमय वातावरणात मिरवणूक होणार आहे.
नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून ‘पसायदान चिंतन’ सोहळ्याविषयी परिसरातील भाविकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.





