नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेचे कर्मचारी रामदास अर्जुन सुसे (वय २६ वर्षे) यांचा रविवार दि.२४ रोजी रात्री मोटारसायकल अपघातात मृत्य झाला.
याबाबद मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील रामदास अर्जुन सुसे हा युवक भेंडा येथील नागेबाबा पतसंस्थेत नोकरीला होता. रविवारी रात्री तो भेंडा येथून मोटारसायकल वरून गोंडेगाव येथील राहत्या घरी जात असताना घरापासून हाकेच्या अंतरावर रस्त्याचे कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर मोटरसायकल आदळून त्याचा अपघात झाला. रात्रीचे ११ वाजून गेले तरी रामदास अजून घरी आला नाही, म्हणून त्याला शोधण्यासाठी घरची मंडळी त्या रस्त्याने आले असता लिंबाच्या झाडाजवळ मोटारसायकलसह रामदास जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोमवार दि.२५ रोजी सकाळी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी १२ वाजता गोंडेगाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे मागे आई-वडील, पत्नी, नऊ महिन्याचा मुलगा, भाऊ असा परिवार आहे.





