Thursday, May 28, 2026

कुकाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनसंवाद मेळावा संपन्न

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नेवासा तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला लाभार्थी मेळावा, गुणवंतांचा सत्कार समारंभ आणि जनसंवाद कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्वर्गीय अजित दादांनी दिलेल्या समाजसेवेच्या प्रेरणेतून गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी पुन्हा नव्या जोमाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कार्याची, नेतृत्वाची आणि सर्वसामान्य माणसासाठी लढण्याच्या जिद्दीची आठवण उपस्थितांच्या मनात पुन्हा जागी झाली. “दादांनी दिलेली समाजसेवेची शिकवण हीच आमची खरी ताकद असून गोरगरीब जनतेची सेवा करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावांतील प्रतिनिधी, नागरिक, कार्यकर्ते आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक गावातील प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. जनतेच्या प्रश्नांसाठी कायम संघर्ष करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुन्हा अधोरेखित करण्यात आली.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुल भैय्या शेख म्हणाले की, “स्वर्गीय अजित दादांनी आम्हाला समाजासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. गोरगरीब, वंचित, शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची ताकद त्यांनी दिली. दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी लढत राहू. आपल्या सर्वांच्या प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळेच जनतेसाठीची ही लढाई अधिक ताकदीने सुरू आहे.”

या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नेवासा तालुका यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. रोजगार व स्वयंरोजगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौ.तस्मिया अब्दुल भैय्या शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि रोजगार निर्मिती क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा संपूर्ण नेवासा तालुक्याला अभिमान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच ज्ञानेश्वरी रवी रींधे हिने फुटबॉलमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले. पिंपरी शहाली येथील कबड्डी संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून गावाचा आणि तालुक्याचा मान उंचावला. या सर्व गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात गुणवंतांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात, स्वर्गीय दादांच्या कार्याची आठवण करून देत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
महिला नेत्या आशाताई बाळासाहेब मुरकुटे यांनी, “भैय्या, तुम्ही गोरगरिबांसाठी असेच लढत राहा, बहिण म्हणून आम्ही कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वास व्यक्त केला.

अनिल नाबदे, सुहास टेमक, आंबादास गायकवाड, जुम्माभाई पठाण, अण्णासाहेब गव्हाणे पाटील, मकरंद राजहंस,श्री. नवथर, राजूभाई शेख, समर्थ गायकवाड, इरफान पठाण, प्रतीक शेजुळ, रवी पिंपळे, सचिन भाऊ, महेश कचरे, महेश जगताप, जावेद शेख, भाऊराव चिंधे पाटील, कमलेश काळे पाटील, प्रणव गहाळ, शुभम धनवटे, विकास थोरात,
ग्रामपंचायत सदस्या हाजी हकिमाबी शेख, गायकवाड ताई, युवक अध्यक्ष अभिराज आरगडे यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अशोक मोरे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!