नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील पीचडगाव येथे असलेली ऐतिहासिक मुक्ताई बारव ही महाराष्ट्राच्या प्राचीन जलसंस्कृतीचे अद्वितीय प्रतीक असून तिचे जतन व संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अब्दुल भैय्या शेख यांनी व्यक्त केले.
पीचडगाव गावातील सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव अब्दुल भैय्या शेख यांनी मुक्ताई बारव येथे भेट देऊन या ऐतिहासिक वास्तूची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ, सामाजिक संघटना आणि तरुण कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या संवर्धन कार्याची माहिती घेतली.
यावेळी बोलताना अब्दुल भैय्या शेख म्हणाले की, “गेल्या काही वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते या ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी सातत्याने परिश्रम घेत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज या प्राचीन वारशाची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली झालेली दिसून येते. हा वारसा जपण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आदरणीय अजितदादांच्या ‘समाजासाठी सदैव कार्यरत राहा’ या शिकवणीप्रमाणे आपणही ‘फुल ना फुलाची पाकळी’ या भावनेतून या कार्यात सहभागी होणार आहोत. गावकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मुक्ताई बारव संवर्धनासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच शासनाच्या विविध विभागांमार्फत या ऐतिहासिक वारसा स्थळासाठी आवश्यक निधी, संरक्षण आणि संवर्धनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,” असेही त्यांनी सांगितले.
नेवासा तालुक्यातील पीचडगाव येथे स्थित मुक्ताई बारव ही दगडी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. बहुभुजाकार उतरत्या पायऱ्या, मध्यवर्ती जलकुंड आणि अत्यंत सुबक बांधकाम यांमुळे ही वास्तू स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची ठरते. स्थानिक परंपरेनुसार या बारवेचा संबंध संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळाशी जोडला जातो. तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या आश्रयातून या बारवेचे बांधकाम झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितली जाते.
राजमाता अहिल्याबाई यांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी अनेक ठिकाणी –* बारवा* विहिरी* तलाव* घाट* कुंड* पाणपोया उभारल्या. त्यामुळे ग्रामीण समाजाला मोठा आधार मिळाला.
पीचडगाव येथील मुक्ताई बारव संदर्भात स्थानिक परंपरेनुसार तिचा संबंध राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याशी जोडला जातो.
अनेक शतकांपासून या बारवेमध्ये जिवंत पाणी असून ती परिसरातील जलव्यवस्थापनाच्या समृद्ध परंपरेची साक्ष देत आहे. ही ऐतिहासिक वास्तू केवळ पीचडगावची नव्हे, तर संपूर्ण नेवासा तालुक्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असल्याचेही अब्दुल भैय्या शेख यांनी नमूद केले
“विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी.” — संत मुक्ताबाई
संत मुक्ताबाई या ओळीतून सांगतात की, समाजात कितीही संघर्ष, वैमनस्य किंवा कटुता निर्माण झाली तरी संतस्वभावी माणसाने शांतता, प्रेम, करुणा आणि समतेचा मार्ग स्वीकारावा. जशी आग विझविण्यासाठी पाणी आवश्यक असते, तसेच समाजातील द्वेष, मतभेद आणि असंतोष दूर करण्यासाठी संतांचे विचार, सहनशीलता आणि प्रेम अत्यंत आवश्यक असते.
संत मुक्ताबाईंच्या या कालातीत विचारांचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे. अशा महान संतांच्या स्मृतींशी आणि परंपरेशी निगडित असलेली मुक्ताई बारव ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून आपल्या संतपरंपरेचा, जलसंस्कृतीचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा जिवंत वारसा आहे.
या पवित्र आणि ऐतिहासिक वास्तूचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हे केवळ ग्रामस्थांचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे हीच संतांच्या विचारांना खरी अभिवादन ठरेल.
“मुक्ताई बारव हा केवळ दगडांचा समूह नसून आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा, जलपरंपरेचा आणि अस्मितेचा जिवंत वारसा आहे. या अमूल्य ठेव्याचे जतन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. इतिहास जपला तरच भावी पिढ्यांना आपल्या वैभवशाली परंपरेची ओळख करून देता येईल,” असे आवाहन अब्दुल भैय्या शेख यांनी यावेळी केले.


