नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील देवसडे येथील मूळ रहिवाशी व आयपीएस अधिकारी ठाणे पोलीस आयुक्त डॉ.पंजाबराव उगले व उस्थळ दुमाला येथील रहिवासी असलेले व सध्या मुंबई पोलीस दलातील गिरगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर वाघ यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल त्यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले असून उद्या दि.१५ ऑगस्ट रोजी पोलीस प्रदान केले जाणार आहे.
भारत सरकार, गृह मंत्रालय यांनी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेण्यासाठी “उत्कृष्ट सेवा पदक” आणि “अति-उत्कृष्ट सेवा पदक” प्रदान करण्याचे घोषित केले आहे. सदर पदके प्रदान करण्याचे अधिकार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहेत.
डॉ.पंजाबराव उगले हे ठाणे पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर श्री ज्ञानेश्वर वाघ हे मुंबईच्या गिरगाव विभागात साहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
या दोन्ही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात ३० वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय सेवा बजावली आहे. हे दोघेही पोलीस दलातील अत्यंत ख्यातनाम आणि सन्माननीय अधिकारी आहेत.
या दोघांनाही २०१८ मध्ये उल्लेखनीय सेवेसाठी “राष्ट्रपती पोलीस पदक” प्रदान करण्यात आलेले आहे.
याव्यतिरिक्त, श्री ज्ञानेश्वर वाघ यांना २०१५-१६ दरम्यान हैती येथे संयुक्त राष्ट्र शांततारक्षक अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना प्रतिष्ठेचे संयुक्त राष्ट्र पदक (UN Medal) देखील प्राप्त झालेले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दीर्घकालीन व निष्कलंक उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यदिन दि.१५ ऑगस्ट २०२६ या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलातील डॉ. पंजाबराव उगले व ज्ञानेश्वर वाघ यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल मी ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी प्रदान केले जाणार आहे


