नेवासा/प्रतिनिधी
सृजन कट्टा, नेवासा यांच्या वतीने आयोजित पुस्तक परिचय स्पर्धेत मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासा फाटा येथील
ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. श्रावणी पिसाळ हिने प्रथम क्रमांक तर यश अकॅडमीच्या ईश्वरी खटकेचा तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत विविध शाळांतील १२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डॉ. राजेंद्र भारूड लिखित ‘मी पाहिलेले एक स्वप्न’ या पुस्तकाचा प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी परिचय सादर करून श्रावणीने परीक्षकांसह उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांची मने जिंकत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले.
याच स्पर्धेत यश अकॅडमी, सोनई येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. ईश्वरी खटके हिने ‘मृत्युंजय’ या गाजलेल्या कादंबरीचा उत्कृष्ट परिचय सादर करून तृतीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनीताताई गडाख,मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, डॉ.निवेदिताताई गडाख, शिक्षण संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ.विनायक देशमुख यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
तसेच एचआर हेड डॉ.संदीप खेडकर , ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य वैभव आढाव,यश अकॅडमीचे प्राचार्य शैलेश दरेकर,उपप्राचार्य आसिफ शेख, शाळेचे विभागप्रमुख, शिक्षकवृंद, पालक आणि हितचिंतकांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.


