नेवासा/प्रतिनिधी
अलनिनोच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करावे असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विश्वस्त डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी केले.
भेंडा येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे दि.७ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित ५ दिवसीय आधुनिक शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन विषयावरील ग्रामीण युवक व युवती प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्र वितरण डॉ.क्षितिज घुले पाटील यांचे हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.शामसुंदर कौशिक व्यासपीठावर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना विविध आधुनिक शेळीपालन तंत्रज्ञानाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कमी जागेत जास्त नफा देणारे शेळीपालन या विषयावर प्रगतिशील शेतकरी कमलेश वाघमोडे यांनी दैनंदिन व्यवस्थापनावर तर नितिन म्हस्के यांनी बोकड विक्री व्यवसायावर मार्गदर्शन केले.
पशुवैद्यकीय अधिकारी . अमोल गायकवाड यांनी, प्रती शेळी पाच वर्षीय उत्पादनातून ३१० किलो मांस उत्पादनाचे गणित आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय योजना या विषयावर आपले अनुभव व उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसमोर मांडले.
डॉ.महेश पारखे यांनी,चांगल्या जातीच्या शेळयांची निवड, करडू संगोपन व लागवडीच्या बोकड निवड पद्धतीमध्ये बदल करून काटेकोर पद्धतीने शेळीपालन केल्यास चांगले उत्पादन येऊ शकते याची खात्री दिली.
पशुधन उत्पादन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ.चंद्रशेखर गवळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ इंजी. राहुल पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ.शामसुंदर कौशिक यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कृष्णा महिला स्वयांसहायता समूह, शेतकरी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. आधुनिक तंत्रज्ञान, शेळीपालनाचा अनुभव आणि शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन यांचा संगम घडवून आणणारा हा ग्रामीण युवक व युवती प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरला. हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी माणिक लाखे,सचिन बडधे, नंदकिशोर दहतोंडे यांनी सहकार्य केले.


