नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील फुलारी परिवाराचे आधारवड बबनराव नामदेव फुलारी (अण्णा) यांचे दशक्रियाचे विधीचे औचित्य साधून फुलारी परिवाराने भेंडा बाजारतळ परिसरात वृक्षरोपण करून उपस्थित नातेवाईकांना ७१ वृक्षांचे वाटप केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील माजी उपसरपंच शिवाजी फुलारी यांचे बंधू , आप्पासाहेब फुलारी, संतोष फुलारी व सौ.संध्या पुंड यांचे वडील, इंजि. नयन व राजन फुलारी यांचे चुलते बबनराव नामदेव फुलारी यांचे दि.१ सप्टेंबर रोजी वयाचे ७१ व्या वर्षी आजारपणाने निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधी निमित्त फुलारी परिवाराने कै. बबनराव यांच्या वया इतके म्हणजे ७१ झाडे लावण्याचा संकल्प केला आणि दशक्रिया विधीच्या दिवशी भेंडा बाजारतळ परिसरात वृक्षारोपण करून व उपस्थित नातेवाईकांना झाडांची रोपे तो संकल्प पूर्ण ही केला.

*सामाजिक दायित्व…
प्रत्येक माणूस जन्माला आला की स्वतःचा प्रपंच,कुटुंब याजबाबदाऱ्या तर निभावतोच,परंतु आपले समाजा प्रती, गावा प्रती आणि निसर्गा प्रती ही आपले काही तरी देणे लागते याची जाणीव प्रत्येक माणसाला असायला हवी. माणूस जन्मल्या पासून मरेपर्यंत निर्सगावर अवलंबून असतो.जगण्यासाठी ऑक्सिजन आणि मृत्यू नंतर ही अंत्यसंस्कारासाठी लागणारे जवळ जवळ एका झाडाचे सरपण निर्सगच आपल्याला देत असते. झाडे संपली तर माणसं ही संपतील ही बाब सूर्य प्रकाशा इतकी स्वच्छ आहे.त्यामुळे झाड लावणं ही आपली जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्यच आहे जाणून फुलारी परीवाराने ७१ वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करून उद्या प्रत्येकाचे दारात मोठी होणाऱ्या झाडामध्ये सर्वजण आपले “अण्णा”च बघणार आहेत.
*झाडे माणसाला काय देतात ?
झाडे माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (ऑक्सिजन),अन्न, फळे, फुले आणि सावली देतात. घरे, फर्निचर, शेतीची अवजारे आणि कागद बनवण्यासाठी लागणारे लाकूड झाडे पुरवतात. कडक उन्हाळ्यात थंडावा आणि सावली मिळते, तसेच पक्षी व प्राण्यांना राहण्यासाठी आसरा मिळतो. झाडे मान्सून आणि पावसाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे मातीची धूप आणि पूर थांबण्यास मदत होते.त्यामुळे प्रत्येक माणसाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे.
-सुखदेव फुलारी(पर्यावरण मित्र)


