Saturday, September 12, 2026

महंत उद्धव महाराज यांचा राज्यस्तरीय धर्मभूषण पुरस्काराने सन्मान

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील श्रीसद्गुरु नायरणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक (नेवासकर) यांना देवळाली प्रवरा येथील इच्छापूर्ती प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय धर्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात इच्छापूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संपत महाराज जाधव, उपाध्यक्ष गणेश भांड, सचिव दत्ता गागरे, गोपाळ शिंदे यांच्या हस्ते महाराजांना सन्मानित करण्यात आले. धार्मिक क्षेत्रातील प्रभावी कार्याबरोबरच लोकप्रबोधनासाठी गौरव म्हणून त्यांना राज्यस्तरीय इच्छापुर्ती गुणीजन गौरव या उपक्रमांतर्गत सन्मानित करण्यात आले. संत विचार, साहित्य, तत्त्वज्ञान यांचा प्रचार, प्रसार त्यांनी गेली अनेक दशके प्रभावीपणे केला आहे. युवक आणि तरुण वर्गाला त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. याबरोबरच विविध तीर्थक्षेत्रांना हजारो भाविकांना नेऊन दर्शन आणि श्रवणाचा लाभ त्यांनी मिळवून दिला आहे.

आपले विचार अतिशय परखडपणे मांडून त्यांनी अनेक प्रश्नांवर आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुले वारकरी शिक्षण घेत आहेत. महंत उद्धव महाराज यांचे विचार आणि कार्याशी हजारो नागरिक जोडले गेले आहेत. ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांचे विचार त्यांच्या मार्गदर्शनातून निरंतर ऐकावयास मिळतात. पाणी फाउंडेशन सारख्या आदर्शवत काम करणाऱ्या संस्थेला आर्थिक मदतीचा हात देताना त्यांनी अनेकांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पुढे येऊन आधार दिला आहे. धार्मिक कार्याबरोबरच त्यांचे सामाजिक कार्यही लक्षवेधी आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!