शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील भागुबाई मुरलीधर जाधव (वय ८२) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.
कै.भागुबाई यांच्या निधनाने जाधव परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि कुटुंबासाठी आयुष्यभर केलेल्या त्यागामुळे भागुबाई जाधव यांची परिसरात विशेष ओळख होती.
भागुबाई यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावत संसाराचा गाडा समर्थपणे पुढे नेला. घरची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी शेतीच्या कामातही पतीला मोलाची साथ दिली. शेतीतील खोदकामासह विविध कामांमध्ये त्या स्वतः सहभागी होत असत. कष्टाची तमा न बाळगता कुटुंबाच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत घेतली.
त्यांचे पती मुरलीधर जाधव यांचा सुक्या मिरचीचा प्रसिद्ध व्यापार होता. या व्यवसायातही भागुबाई यांनी पतीला मोलाची साथ दिली. संसार आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांभाळत दोघांनी कष्टाने आर्थिक स्थैर्य निर्माण केले. व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून स्थावर मालमत्ता उभी करण्यातही भागुबाई यांचा मोठा वाटा होता. कष्ट, प्रामाणिकपणा आणि चिकाटीच्या जोरावर संसार उभा करणाऱ्या भागुबाई यांच्या जीवनप्रवासाचे परिसरात कौतुक होत असे.
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रेम, आधार आणि आपुलकी देत त्यांनी मोठा परिवार जोडून ठेवला. साधेपणा, कष्टाळूपणा आणि कुटुंबाप्रती असलेली निष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाने जाधव परिवाराने प्रेमळ आधार देणारी आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी व्यक्ती गमावली आहे.
त्यांच्या पश्चात लिंबाजी जाधव व पत्रकार बाळासाहेब जाधव हे दोन मुले, सौ. रुख्मिणी चोपडे व सौ. सुनंदा गाडे या दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भागुबाई यांच्या निधनाने जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.
दै.जलभूमिचे मालक-संपादक
बाळासाहेब जाधव यांच्या त्या मातोश्री होत.


