नेवासा/प्रतिनिधी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसर विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांना ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी केला असून त्यात म्हंटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत “श्री क्षेत्र देवगड, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर” या “ब” वर्ग ग्रामीण यात्रास्थळाच्या ठिकाणी विविध विकास कामांकरीता निधी उपलब्ध करुन देणेबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. या प्रस्तावावर मा. सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षते खालील राज्य निकष समितीच्या दि.१९ ऑगस्ट, २०२६ रोजी झालेल्या बैठकीत विचार करण्यात आला. सदर बैठकीत उपरोक्त नमूद यात्रास्थळाच्या ठिकाणी करावयाच्या विकास कामांची अंदाजपत्रके व इतर कागदपत्रांची तपासणी करुन समितीने विकास कामांकरिता निधीची शिफारस केली आहे. त्यानुसार सदर यात्रास्थळाच्या ठिकाणी करावयाच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) (२५१५ २५६६) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीत निधीतून “श्री क्षेत्र देवगड, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर” या “ब” वर्ग यात्रा स्थळाच्या ठिकाणी भोजन प्रांगण येथे क्राँक्रिटीकरण करणे व परिसरात विद्युत कामे, सोलार कामे करणेसाठी एकूण रु.३,००,००,०००/- (रुपये तीन कोटी फक्त) एवढ्या रक्कमेच्या खालील विकास कामांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सातत्याने पाठपुरावा करून श्रीक्षेत्र देवगड संस्थान विकासासाठी निधी मिळवून दिल्याबद्दल श्रीक्षेत्र देवगड भक्तगण व भाविकांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी धन्यवाद दिले आहेत.


