Tuesday, October 27, 2026

तेलकुडगाव येथील डॉ.आंबेडकर यांचा पुतळा अनधिकृतपणे हटविल्याच्या निषेधार्थ नेवासा फाटयावर दीड तास रस्तारोको

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृतपणे काढून नेल्याच्या घटने विरोधात जिल्हाभरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ सोमवार दि.२६ रोजी दुपारी १२ वाजता नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गवरील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौक ते डॉ.आंबेडकर चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बचाव कृती समितीच्यावतीने सुमारे दिड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलतांना रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले की,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या पुतळ्याशी जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत.प्रशासनाने काही दिवसांतच पुतळा आहे त्याच ठिकाणी सन्मानपूर्वक बसवला नाही तर लोकशाही व शांततामय मार्गाने होणाऱ्या तीव्र आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील,असा धडक इशारा देत ते म्हणाले की,पुतळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न हा अस्मितेचा प्रश्न आहे.प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले तर हा लढा रस्त्यापासून मंत्रालयापर्यंत नेऊ,असा इशारा त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य नेते प्रा.किसन चव्हाण म्हणाले की,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोणत्या आदेशाने व कोणाच्या परवानगीने हटवला गेला याचा खुलासा प्रशासनाच्यावतीने करण्यात यावा तसेच आमच्या शांततेचा आणि सहनशीलतेचा अंत आता पाहू नये प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे ‘त्या’ जागी पुन्हा बसवीला नाहीतर आम्ही स्वतः तेलकुडगावात येथे जाऊन महामानवाचा पुतळा बसविणार असून मंग होणाऱ्या परिणामास शासन आणि प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा निर्वांनीचा इशाराही यावेळी बोलतांना स्पष्ट शब्दात दिला.

रिपाईचे तालुकाध्यक्ष सुशील धायजे,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे,रिपाईचे शहराध्यक्ष पप्पू इंगळे यांनी या आंदोलनाचे नेत्तृत्व केले.

अड.संजय सुखधान, आरपीआय तालुकाध्यक्ष सुशील धायजे,शहराध्यक्ष पप्पू इंगळे,वंचितचे तालुकाध्यक्ष पोपट सरोदे,दयानंद खिल्लारे,विजय गायकवाड,स्वप्निल सोनकांबळे आदी मान्यवरांची भाषणे झाली यावेळी आंदोलकांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी स्वीकारले या आंदोलनास मोठ्या संख्येने भीमसैनिक,महिला भगिनी, युवक-युवती यावेळी उपस्थित होत्या.

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार,उपनिरीक्षक विकास पाटील,सहायक फौजदार गणेश नागरगोजे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त करत रस्ता रोको झाल्यानंतर वाहतुकीस महामार्ग सुरुळीत केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!