अहिल्यानगर, दि. २७ नोव्हेंबर२६
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ पुरस्कार मिळविण्यापुरते मर्यादित नसून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे पारदर्शक आणि परिणामाभिमुख अभियान आहे. ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढविण्याबरोबरच गावांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या अभियानातून दिशा मिळत आहे. गावाच्या विकासाचे नियोजन ग्रामस्थांनी एकत्रितपणे केल्यास उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर होऊन विकासकामांना अधिक गती मिळेल, असे प्रतिपादन विधानसभा सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’ अंतर्गत ‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावांचा संकल्प’ या विषयावरील नाशिक विभागस्तरीय कार्यशाळा, पुरस्कार वितरण सोहळा व सरपंच परिसंवाद शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथील द्वारका लॉन, नेप्ती चौक, नगर-कल्याण रोड येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी सभापती राम शिंदे बोलत होते.
राम शिंदे पुढे म्हणाले की, गावांच्या विकासासाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संवर्धन या विषयांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना ग्रामस्थांनीही विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे काम इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी असून त्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण कामांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन आपल्या गावाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सुनील कर्जतकर, काशिनाथ दाते, मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, अमोल खताळ, अक्षय कर्डिले, ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
*ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचे उद्दिष्ट आहे. शहरांप्रमाणेच गावांचाही विकास होणे आवश्यक आहे. ग्रामविकासासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आणि एकजुटीने कामकाज करणे गरजेचे आहे. विविध विभागांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. या अभियानात राज्यातील ५ हजार ६४४ गावांनी सहभाग घेतला असून विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामे करण्यात आली आहेत.
४ हजार १८ ग्रामपंचायतींच्या वेबसाईट तयार करण्यात आल्या असून ४ हजार ४७ गावांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. ५ हजार १५८ ग्रामपंचायतींनी विविध सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. गावांमध्ये व्यायामशाळा, मुलींसाठी शाळांमध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून ३ लाख ६० हजार घरे पूर्ण झाली आहेत. अनेक विकासकामे लोकवर्गणीतून झाली असून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
*राज्यमंत्री योगेश कदम…
राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे अभियानाला बळ मिळाल्याचे सांगितले. विविध शासकीय योजनांची सांगड घालून गावांचा सर्वांगीण विकास साधणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात शंभर टक्के ग्रामपंचायतींचा सहभाग अपेक्षित आहे. वनराई बंधारे उभारणे, जलस्रोत पुनर्जीवित करणे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
*डॉ.अविनाश पोळ..
पाणी फाउंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. या अभियानामुळे ग्रामीण महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा मिळत असून गावांच्या विकासाची चळवळ उभी राहत आहे. आगामी काळात हवामान बदल, घटती भूजल पातळी आणि पाण्याचा वाढता वापर लक्षात घेता प्रत्येक गावाचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्यावर भर देणे आवश्यक आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जलसुरक्षेला महत्त्वाचा निकष बनविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी विश्वनाथ कोरडे यांनी जलतारा या जलसंधारणाच्या कामासाठी वैयक्तिकरित्या ५ लाख रुपयांची देणगी दिली. त्यांच्या या योगदानाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
*पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव…
*विभागस्तर..
या अभियानांतर्गत नाशिक विभागस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत दुगांव (ता. जि. नाशिक) हिने प्रथम क्रमांक पटकावून १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविले. ग्रामपंचायत रेनवडी (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हिने द्वितीय क्रमांक व ८० लाख रुपये, तर ग्रामपंचायत लोणी बु. (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) हिने तृतीय क्रमांक व ६० लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले.
*जिल्हास्तर…
अहिल्यानगर जिल्हास्तरावर ग्रामपंचायत कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) हिने प्रथम क्रमांक व ५० लाख रुपये, ग्रामपंचायत सौंदाळा (ता. नेवासा) हिने द्वितीय क्रमांक व ३० लाख रुपये, तर ग्रामपंचायत हिवरे बाजार (ता. अहिल्यानगर) हिने तृतीय क्रमांक व २० लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला.
कार्यशाळेत ‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावांचा संकल्प’ या विषयावर सरपंच परिसंवाद आयोजित करण्यात आला. यामध्ये जलसंधारण, पाण्याचे नियोजन, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, लोकसहभाग आणि ग्रामविकासाच्या विविध उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अभियानाची संकल्पना आणि नाशिक विभागातील कामांचे सादरीकरण केले. ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास नाशिक विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा व तालुकास्तरीय विभागप्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले, तर आभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी मानले.


