माय महाराष्ट्र न्यूज: हे घराणं दहा घर फिरलेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने आमची सत्ता आल्यावर यांच्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी लावणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी विखे पिता पुत्राचे नाव न घेता दिला आहे. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभांचा दौरा करत आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांसह जनतेशी
संवाद साधत आहेत. विखे पाटलांच्या मतदारसंघातील राहता शहरात झालेल्या जनसंवाद मेळाव्यात ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली.उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की यांच्या वडिलांना शिवसेनाप्रमुखांनी
आयुष्यात पहिल्यांदा मंत्री केलं पण तेही ते विसरले. मात्र, जिथे सत्ता तिथे आम्ही अशी यांची सवय पण आता कुठे जाणार? कारण भाजप त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या ठिकाणी असून पुढची सत्ता
आमच्याकडे येणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांना विचारतो ते परत आले तर तुम्ही त्यांना घेणार का? मी तर त्यांना घेणारच नाही आणि तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यावर त्यांच्या सगळ्याच भ्रष्टाचाराची चौकशी
लावणार आहे. तुम्ही उतमात करत आहे तुम्हाला वाटत असेल कोणी विचारणार नाही पण असं नसतं. दिवस सगळे सारखे नसतात दिवस बदलत असतात आज तुम्हाला वाटतं की तुमचे दिवस आहेत पण उद्याचा दिवस हा आमचा आहे, अशा शब्दात
उद्धव ठाकरेंनी विखे पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी मंचावर खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, भाऊसाहेब वाकचौरे, प्रभाताई घोगरे, काँग्रेसचे सचिन चौगुले आदी उपस्थित होते.
‘या घरफोड्या मंत्र्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला असं वाटत असेल की इतरांचे पक्ष फोडले तर हे लढणारच नाहीत. आज अशोक चव्हाण भाजपवासी झाले. पहिल्या प्रथम संसदेत पंतप्रधानांकडून
स्वतःच्या पक्षाचा प्रचार करणारं भाषण हे प्रथमच झालं. ते काय म्हणाले की अब की बार चार सौ पार, मग चार सौ पार होण्यासाठी तुम्हाला तुमच्या पक्षावर भरवसा नाही, तुमच्याकडे कुठले नेते नाहीत,
कार्यकर्ते नाहीत?तुम्हाला इतर पक्षातील नेते घ्यावे लागतात, इथेच तुमची मानसिकता कळतेय, तुम्ही हरलेले आहात, असं ठाकरे म्हणाले.