माय महाराष्ट्र न्यूज:हवामान खात्याने पुढील २४ तासांत तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांना तुफान पावसाचा
इशारा दिला आहे. तर काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
आयएमडीने २३ ते २६ मार्च दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम
पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम आणि मेघालयमध्ये 23 आणि 25 मार्च रोजी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.स्कायमेटच्या
अंदाजानुसार, पुढील २४ तासांत पश्चिम हिमालयीन प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. ईशान्य भारतात एक किंवा दोन ठिकाणी हलका
पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिशा, दक्षिण तामिळनाडू, केरळ, किनारी कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.दुसरीकडे जम्मू-काश्मीर,
लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांना हिमवृष्टी तसेच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४ दिवसांत दिल्लीतील तापमानात मोठी
वाढ होणार असून नागरिकांना उन्हाच्या झळा बसेल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.महाराष्ट्रातील हवामानाबाबत बोलायचं झाल्यास पुढील तीन ते चार दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही
जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. मुंबई-पुण्यात
तापमानाचा पारा वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.