नेवासा
प्रत्येक नागरिकांनी मतदानाचे आपले कर्तव्य निभावले तर लोकशाही व्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे मत निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप यांनी व्यक्त केले.
नेवासा तहसील कार्यालयात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी एस. बी. कराड, गटविकास अधिकारी संजय लखवाल, तालुका आरोग्य अधिकारी डी.पी.डिंबर, शमी शेख आदी उपस्थित होते.
श्री.सानप म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला मतदानाचा महत्त्वपूर्ण अधिकार प्राप्त झालेला आहे. या अधिकाराचा वापर करणे आपले कर्तव्य आहे. तरूण-तरूणी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांबरोबर समाजातील सर्व घटकांनी लोकशाहीच्या या महोत्सवात सहभागी होऊन आपले मतदान अवश्य करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांमधून प्रातिनिधिक स्वरूपात श्रीमती सुनीता दरंदले, मीरा थोरात, संजिवनी घोडके, शिला काकडे, सुनीता खालपूडे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांना याप्रसंगी मतदानाची शपथ देण्यात आली.