अहिल्यानगर
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी संस्थानमध्ये मानधनावर काम करणाऱ्या एकूण ६५ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२५ पासून सातव्या वेतन आयोग होणार आहे.
नवीन वर्षाच्या १ तारखेपासून ही वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे देवस्थान समितीकडून कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले असून, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानमधील मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी २०१९ साली अहिल्यानगर येथील कामगार न्यायालयात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते देण्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी मार्च २०२४ मध्ये उपोषण करून वेळोवेळी याबाबत देवस्थान समितीकडे पाठपुरावा केला.
दि.२५ डिसेंबर रोजी विषयावर देवस्थान समितीचे चेअरमन तथा जिल्हा सत्र न्यायाधीश महेश लोणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या वेळी विश्वस्त तथा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, अॅड. कल्याण बडे, शशिकांत दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, बाळासाहेब दहिफळे, अॅड. विक्रम वाडेकर, श्रीधर देशमुख, श्रीराम परतानी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे व कर्मचारी प्रतिनिधी मारुती सुदाम दहिफळे, शहादेव भगवान पालवे
आदी उपस्थित होते.
या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या विषयावर चर्चा करण्यात आल्यानंतर याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. त्यामध्ये मानधनावर काम करणारे ४८ कर्मचारी, तर सहाव्या वेतन आयोगानुसार काम करणारे १७ कर्मचारी, यांसह एकूण ६५ कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या १ जानेवारी २०२५ पासून सातव्या आयोगानुसार वेतन व भत्ते लागू करण्यात येणार आहेत. सेवाज्येष्ठता ही कर्मचाऱ्यांच्या ज्या तारखेपासून पीएफ कपात करण्यात आला, त्या तारखेपासून धरण्यात येईल. तसेच, मागील सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला १ लाख २१ हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. हा ठराव संमत होताच कर्मचाऱ्यांनी देवस्थान समितीचे आभार मानत आनंदोत्सव साजरा केला.
न्यायालयातील तक्रार मागे घेणार देवस्थान समितीच्या विरोधातील कामगार न्यायालयात असलेली तक्रार मागे घेण्याचे कर्मचाऱ्यांनी मान्य केले. देवस्थान समितीचे विश्वस्त अड. कल्याण बडे यांनी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याचा ठराव मांडला होता. या ठरावाला सर्वांनी मान्यता देऊन ठराव संमत केला.
अखेर संघर्ष संपला...
या निर्णयाने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रक्रियेमध्ये सर्वांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य लाभले असून देवस्थानचे चेअरमन व विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ व इतर घटक सर्वांचे कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार.
-मारुती सुदाम दहिफळे.
उपाध्यक्ष,लाल बावटा कामगार युनियन अहिल्यानगर