Saturday, August 30, 2025

प्रवरा साहित्य पुरस्काराने सन्मानित भविष्यात साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरले-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

शिर्डी, दि. ८ 

सलग ३५ वर्षांपासून साहित्यिक व कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याची परंपरा प्रवरा परिवाराने अखंडपणे जपली आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा पुरस्कार सोहळा आज मराठी साहित्यविश्वातील एक मानाचा पुरस्कार म्हणून मान्यता पावला आहे. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले अनेक साहित्यिक पुढे साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंतीदिनानिमित्त प्रवरानगर येथे प्रवरा परिवारातर्फे आयोजित साहित्य व कला गौरव पुरस्कार वितरण सोहळा आणि शेतकरी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलींद जोशी होते.

याप्रसंगी आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार अमोल खताळ, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, धनश्री विखे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे म्हणाले, “यंदाचा पुरस्कार सोहळा काही विशेष पार्श्वभूमीवर साजरा होत आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीचे हे १२५ वे वर्ष! त्याचवेळी युनेस्कोने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला, ही सर्व मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.”

“आजच्या या सोहळ्यात साहित्य, कला आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान केला जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे ही सहकारपंढरी अधिकच प्रेरणादायी व उजळून निघालेली आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या गौरव सोहळ्याच्या माध्यमातून मराठी सारस्वतांचा सन्मान करण्याचे भाग्य प्रवरा परिवाराला लाभते, हे आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. साहित्य, कला व संस्कृतीची अभिरुची जोपासण्याच्या आमच्या प्रयत्नांना आपला असाच सक्रिय पाठिंबा लाभावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.”

अध्यक्षीय मनोगतात डॉ. जोशी म्हणाले, “साहित्य ही केवळ अभिव्यक्ती नसून ती समाज परिवर्तनाची शक्ती आहे. लेखकांनी सत्याचा शोध घ्यावा, कोणत्याही गटाच्या दबावाखाली न राहता स्वतंत्र विचार करावा, हीच साहित्यिकांची खरी जबाबदारी आहे. विचारधारेपेक्षा विचार महत्त्वाचा आहे. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा अतिरेक होत असतानाही, माणुसकी जपणारी संवेदनशीलता टिकवण्यासाठी साहित्य अत्यावश्यक आहे.”

“आपल्या समाजात विचारशक्ती, तर्कशुद्धता, विवेक व विज्ञाननिष्ठा यांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे साहित्य, संगीत, चित्रकला यांची नाळ समाजाशी घट्ट राहिली पाहिजे. ग्रंथालये ओस पडत आहेत, वाचनसंस्कृती कमी होत आहे, हे चिंतेचे कारण आहे. मराठी भाषेचे जतन करणे व तिचा अभिजातपणा टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

“महाराष्ट्राच्या संस्कृतीत राजकारण रुजवण्यासाठी जितका प्रयत्न आवश्यक आहे, तितकाच संस्कृतीच्या माध्यमातून राजकारणाला सुसंस्कृत दिशा देणेही गरजेचे आहे. भाषेचा आणि विचारांचा मर्यादित वापर न करता व्यापक व विवेकी संवाद घडवणे ही काळाची गरज आहे,” असेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.

जीवनगौरव पुरस्कार्थी साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे म्हणाले, “साहित्य पुरस्कारासाठी संपूर्ण गाव उपस्थित राहते, हे मी प्रथमच पाहत आहे. विसाव्या शतकात जनमानसावर ललित साहित्याचा प्रभाव होता. एकविसावे शतक वैचारिक साहित्याचे आहे. वैचारिक साहित्यातूनच समाज प्रगल्भ होतो. महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी घडवली. आज आपल्या जाणीवा कमी झाल्या आहेत. जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. देशाला जेव्हा वाचन करणारा नेता लाभतो, तेव्हा देशाचे भविष्य बदलते.”

अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर पुरस्कार्थींच्या वतीने प्रतिनिधी म्हणून अतांबऱ्या शिरढोणकर यांनी मनोगत मांडले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराने साहित्य, नाट्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने गौरविण्याची परंपरा सुरू केली. यंदाचे हे ३५ वे वर्ष होते.

यावर्षी साहित्यक्षेत्रात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार कोल्हापूरचे डॉ. सुनिलकुमार लवटे यांना प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मुंबईच्या डॉ. मिनाक्षी पाटील आणि डॉ. एच. व्ही. देशपांडे यांना देण्यात आले. राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप यांना, तर राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार अतांबऱ्या शिरढोणकर व प्रसाद अंतरवेलीकर यांना प्रदान करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार संगमनेरचे संतोष भालेराव यांच्या ‘लालायलू’ या कादंबरीस, तर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार संगमनेरचे श्रीकांत कासट यांच्या ‘दुर्ग वैभव’ या पुस्तकास देण्यात आला. प्रवरा परिसर पुरस्कार संदीप तपासे यांच्या ‘काठावरची माणसं’ या कथासंग्रहाला मिळाला. तसेच वयाच्या ८०व्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावर शोधनिबंध सादर करणारे व त्यांच्या कार्यावर ‘सहकाराचा कल्पवृक्ष – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील’ हे पुस्तक प्रकाशित करणारे डॉ. वसंतराव ठोंबरे यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार निवड समितीमध्ये अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, सदस्य एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, प्रा. राजेंद्र सलालकर यांचा समावेश होता. पुरस्कारांची अधिकृत घोषणा श्री. रावसाहेब कसबे यांनी केली.

कार्यक्रमात राजा मंगळवेढेकर लिखित ‘भूमिपुत्र’ या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!