अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांचा आधुनिक पद्धतीने कपाशी लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कल आढळून आला आहे असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याचे मंडल कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांच्या समवेत प्रगतशील शेतकरी सखाहरी कोरडे यांच्या शेतावर कृषी शास्त्रज्ञ डॉ.ढगे यांनी शेतकऱ्यासमवेत कपाशी पिकाची पाहणी केली. सखाहरी कोरडे यांना मूलतः शेतीची आवड आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय कष्टातून कपाशीचे पीक आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्तम प्रकारे उभे केले आहे. त्यांनी कपाशीची उत्तम प्रकारे पूर्व मशागत करून ६ जून २०२५ रोजी नाथ संकरित वाणाची लागवड केली. पाण्याचे उत्तम नियोजन केले. तसेच सेंद्रिय पदार्थांचा शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करून रासायनिक खताला फाटा दिला फक्त एक गोणी एकरी १५:१५:१५ सुफला वापरला शेणखताच्या भरघोस वापरामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला नाही. एक एकर मध्ये त्यांनी दहा क्विंटल उत्पादन अपेक्षित धरले आहे आत्तापर्यंत त्यांचा खर्च २० हजार रुपये प्रति एकरी झाला असून कापसाला किमान आधार भूत किंमत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी दिनकरराव धस, संजय कोरडे, संतोष पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.