भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा यात्रे निमित्त सोमवार दि.११ ऑगस्ट रोजी हजारो भाविकांनी नागेबाबा समाधी दर्शनाचा लाभ घेतला आहे.यात्रे निमित्त आलेल्या भाविक भक्तांना ५७ कढई आमटी व भाकरीचे वाटप करण्यात आले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी श्रीसंत नागेबाबांची यात्रा भरते. सोमवार दि.११ ऑगस्ट रोजी यात्रेच्या दिवशी सकाळी ९ वाजता भेंडा खुर्द मारुती मंदिरापासून श्रीसंत नागेबाबांचे पादुका व गंगेच्या पाण्याच्या कावडींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकी नंतर दुपारी नागेबाबांचे समधीस गंगेच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. आपल्या बाळाची करणी धरणी,इडा पीडा टाळावी व उत्तम आरोग्य लाभावे यासाठी महिला भगिनी आपल्या मुलांना श्रीसंत नागेबाबांचे पालखी खाली टाकले. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला घरी नेण्यासाठी आमटीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. यासाठी ५७ कढई (सुमारे २८ हजार लिटर) आमटी तयार करण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाची सवाद्य मिरवणूक झाली. उपस्थित भाविकांना आमटी-भाकरीची पंगत देण्यात आला.
यात्रेतील कावडी मिरवणुकीसाठी ढोलतासा, झांज पथक या पारंपरिक वाद्यांचा वापर केल्याने मिरवणूक शांततेत पार पडली.यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व यात्रा कमिटी सदस्य उपस्थित होते.
यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.मिठाई,खेळणी,सौंदर्य प्रसाधन,गृह उपोयोगी वस्तू,मनोरंजक खेळांची दुकाने थाटली होती.
गुरुवर्य मिराबाई महाराज मिरीकर, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे आदींनी दर्शन घेतले.
आज मंगळवार दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तनाने हरिनाम सप्ताह व यात्रेची सांगता होईल.दोन दिवस भेंडा गावाचे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने यात्रेत भाविकांचा उत्साह दिसून आला.
*रक्तदान शिबिर…
श्रीसंत नागेबाबा यात्रोत्सवानिमित्त
श्री संत नागेबाबा संस्थान, श्री संत नागेबाबा परिवार, श्रीराम सेवा मंडळ व साईसेवा ब्लड बँक, अहिल्यानगर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरात ५० हुन अधिक रक्तदात्यानी रक्तदान केले.