पन्हाळा/प्रतिनिधी
सध्या जमिनीचे क्षेत्र कमी झाले आहे. कारखानदारीमुळे साखर उद्योग वाढत आहे,पण त्यातही बदल होत पूर्वी १२०० ते २००० गाळप क्षमता असलेल्या कारखान्यात कामगार संख्या २००० होती. आज त्याच कारखान्याची गाळप क्षमता वाढली कामगार संख्या तीच आहे. त्यामुळे कामगाराला दिवसेंदिवस नवीन व्यवसाय शोधावा लागत आहे. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कारखानदार व कामगार संघटनांनी सकारात्मक विचार करणे
गरजेचे आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर कामगार संघटना मजबूत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषि मंत्री खा. शरद पवार यांनी केले.
पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या तीनदिवसीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अर्थमंत्री, आमदार जयंत पाटील होते.माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज जाचक व गणपतराव पाटील, उपाध्यक्ष अशोक बिराजदार, नितीन बेनकर, डी. एम. निमसे, प्रदीप शिंदे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव योगेश हंबीर, संजय मोरबाळे, एम. एम. पाटील, विलास शिंदे आदि यावेळी उपस्थित होते.
श्री.पवार पुढे म्हणाले की, कामगार हा महत्त्वाचा असून, कामगारांत स्थैर्य येणे गरजेचे आहे. सध्या कारखान्यांचे खासगीकरण सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कामगारांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. राज्य शासनाने कामगारांचे प्रश्न सोडवले नाही तर ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल, अशी चिंता माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
पूर्वी शेतीखाली ८२ टक्के जमीन होती. ती आता ५२ टक्क्यांवर आली आहे. साखर कारखान्यांत नवीन तंत्रज्ञान आल्याने कारखान्यांची संख्या वाढली. पण कामगार कमी झाले. त्यांच्या समस्या गंभीर बनत आहेत. साखर, इथेनॉल, मोलॅसिस, वीज निर्मिती सुरू असूनही कारखान्यांकडे ६०० कोटी रुपये कामगारांचे थकीत आहेत. जवळपास ४० टक्के कामगार कंत्राटी असून त्यामुळे कामगारांची स्थिरता धोक्यात आली आहे.काही साखर कारखानदार स्थानिक लोकांना हाताशी धरून मर्जीतील लोकांची युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मान्यताप्राप्त युनियनसाठी अतिशय घातक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील संघटन अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. ते काम यापुढील काळात कामगार प्रतिनिधी मंडळाने करावे. कामगार टिकला तरच साखर कारखानदारी टिकणार आहे, याचे भान साखर उद्योगानेही ठेवावे, असेही पवार म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात आ. जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात साखर कामगारांची आव्हाने मोठी झाली आहेत. कामगारांबरोबरच शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. सध्या साखर
कारखान्यात ४० टक्के कामगार कंत्राटी असल्यामुळे मूळ कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. कामगारांच्या हितासाठी संघटित झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी प्रास्ताविकात कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश्न मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली.
सरचिटणीस रावसाहेब पाटील यांनी
कार्यक्रमाचे स्वागत केले. उपाध्यक्ष रणनवरे यांनी आभार मानले.




