नाशिक/प्रतिनिधी
देशाची लोकसंख्या १४० कोटींवर गेली आहे, मात्र तुलनेत पाण्याची उपलब्धता होईलच असे नाही. त्यामुळे येत्या काळात पाण्याचा कार्यक्षम वापर व व्यवस्थापन होणे करणे गरजेचे आहे. अन्यथा युद्धजन्यस्थिती निर्माण होईल. आता ‘पाणी वाचवा, ऊर्जा वाचवा व पृथ्वीला वाचवा’ हे देखील म्हणण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (मेरी) महासंचालक संजीव टाटू यांनी केले.
पालखेड पाटबंधारे विभागातर्फे ‘सिंचननामा २०२५’च्या १८ व्या आवृत्तीचे प्रकाशन मेरी (नाशिक) येथील पां. कृ. नगरकर सभागृहात करण्यात आले. या वेळी अध्यक्ष स्थानावरून श्री.टाटू बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभागाचे कर्मचारी व अभिनेते पंढरीनाथ कांबळे हे होते.
या वेळी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव प्रकाश भामरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला, ‘मेरी’चे माजी महासंचालक प्रमोद मांदाडे, जलसंपदा विभागाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक राजेश गोवर्धन, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांसह विविध प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बेलसरे यांच्या संकल्पनेतून ‘सिंचननामा’ गेल्या १८ वर्षांपासून प्रकाशित करण्यात येत आहे. या वेळी विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पाणीवापर संस्था, अति. उत्कृष्ट काम करणारे अभियंते, त्यांचे गुणवंत पाल्य यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
*…या पाणीवापर संस्थांचा झाला सन्मान
उत्कृष्ट पाणीवापर संस्था : माती पाणी (नैताळे), त्रिमूर्ती (नांदगाव), सद्गुरू (पिंपळगाव लेप), लक्ष्मीमाता (आंबे दिंडोरी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (दिंडोरी), श्रीकृष्ण (पाडे), सरस्वती पाणी (उगाव), दवकुंभ (दावचवाडी), नागेश्वर (येवला), मनकर्णा (पालखेड), तिसगाव प्रकल्प घरण महासंघ (तिसगाव) यांचा तर पाणीवापर संस्था उत्कृष्ट दफ्तर तपासणीअंतर्गत मोहाडी प्रकल्पस्तरीय पाणीवापर महासंघ, जय जनार्दन पाणीवापर संस्था (को-हाटे), छत्रपती ठिबक उपसा पाणीवापर संस्था (मडकीजांब) यांचा सन्मान झाला.




