नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील विविध प्रसिद्ध देवस्थानांच्या विकासासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.
अधिक माहिती देताना आ.लंघे म्हणाले की, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत नेवासा तालुक्यातील विविध प्रसिद्ध देवस्थानांच्या विकासासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासाच्या भूमीवर श्रद्धा, अध्यात्म आणि संस्कृतीचा संगम लाभला आहे. या संतभूमीचा सर्वांगीण विकास धार्मिक पर्यटनातून साधता येईल. या उपक्रमामुळे श्रद्धास्थळांचे सौंदर्यीकरण, यात्रेकरूंसाठी सुविधा आणि तालुक्याचा पर्यटन नकाशा अधिक समृद्ध होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांचे मनःपूर्वक आभार मानताना आमदार लंघे म्हणाले, “नेवासा ही संत परंपरेची भूमी असून, येथे असलेली प्रत्येक देवळे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. या पवित्र स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचे उन्नतीकरण, मंदिर परिसरांचा विकास आणि यात्रेकरूंसाठी आधुनिक सुविधा उभारणे हे आमचे प्राधान्य आहे. पुढील काळातही देवस्थानांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही.”
निधी मिळाल्याच्या आनंदात या सर्व देवस्थानांच्या विश्वस्त मंडळांनी फटाके फोडून उत्सवाचे स्वरूप दिले. भाविकांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांचे आभार मानत “संतभूमीचा विकास म्हणजे श्रद्धेचा उत्सव” अशा शब्दांत समाधान व्यक्त केले.
या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झालेली देवस्थाने पुढीलप्रमाणे…
तुळजाभवानी माता व हनुमान मंदिर देवस्थान (खामगाव), विठ्ठल-रुक्मिणी अध्यात्मिक केंद्र (गोणेगाव चौफुला), जगदंबा माता देवस्थान शिरसगाव, हनुमान मंदिर (बेलपिंपळगाव), श्रीदत्त सीनाई देवस्थान (भानसहिवरे), महालक्ष्मी मंदिर संस्थान (वरखेड), खंडोबा मंदिर (म्हाळसा माहेर), सचितानंद बाबा (ज्ञानेश्वर लेखक) व नारद मुनी मंदिर देवस्थान नेवासा बुद्रुक.


