अहिल्यानगर/सुखदेव फुलारी
अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य करेल.
जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या अडचणींबाबत सकारात्मक विचारविनिमय करून योग्य आणि सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या विविध अडचणी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित प्रश्नांवर १२ जानेवारी २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व उपाध्यक्ष अड. माधवराव कानवडे यांचे प्रमुख उपस्थितीत राज्य फेडरेशनच्या शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. त्या वेळी श्री.घुले बोलत होते.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,महाराष्ट्र राज्य फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक जिल्हा विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढ़े,नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे,अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मधुकर नवले, अकोले तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भाऊपाटील नवले, श्रीरामपूर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे,अहिल्यानगर मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे, नितीन चासकर आदी यावेळी उपस्थित होते.
*काका कोयटे...
यावेळी बोलतांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, “सहकारी पतसंस्था या ग्रामीण व शहरी भागातील सामान्य घटकांचा आर्थिक कणा आहेत. या पतसंस्थांना सक्षम व स्थिर ठेवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार्याची आणि सकारात्मक भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे. परस्पर विश्वास, समन्वय आणि सहकाराच्या भावनेतूनच जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक बळकट होऊ शकते.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत राज्य फेडरेशन व जिल्ह्यातील पतसंस्थांच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी व त्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य लाभावे, या उद्देशाने या निवेदनात विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पतसंस्थांच्या ठेवींवर ०.५० टक्के इतका वाढीव व्याजदर द्यावा, जिल्हा बँकेत ठेवलेल्या ठेवींवर ओव्हर ड्राफ्ट सुविधा घेतल्यास त्या ओव्हरड्राफ्टवर ०.२५ टक्के इतका कमी व्याजदर आकारावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय राखीव निधीतील गुंतवणुकीवर पूर्वी लागू असलेले व्याजदर पुनः लागू करावेत, सहकारी पतसंस्थांना सोनेतारणावर पुनः कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच अडचणीत असलेल्या पतसंस्थांना स्थावर मालमत्तेच्या तारणावर कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा महत्त्वाच्या मागण्या या बैठकीत मांडण्यात आल्या.


