Sunday, March 29, 2026

शिरसगाव येथे राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे संत गजानन (शेगाव) महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त पहिल्यांदाच भव्य राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला रविवार दि.१ फेब्रुवारी २०२6 पासून प्रारंभ होणार असून रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार असल्याची माहिती आयोजक प्रा.
गणेश देशमुख यांनी दिली.

शिरसगाव येथे आठ दिवस चालणाऱ्या महोत्सवासाठी १२ हजार भाविक बसू शकतील अशी भव्य मंडप व्यवस्था, आकर्षक व प्रशस्त व्यासपीठ उभारण्यात आले असून सप्ताहस्थळाला ‘संत गजानन महाराज नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. सुमारे २५० परीसरातील टाळकरी, महाराष्ट्रातील नामवंत गायक, संत-महंतांची मांदियाळी तसेच विविध राजकीय मान्यवरांची उपस्थिती या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

महोत्सवात ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प. बाळासाहेब महाराज रंजाळे, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे, ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे, ह.भ.प. समाधान महाराज शर्मा या राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.
दररोज सकाळी पहाटे ४ ते ६ काकडा, ६ ते ६.३० आरती, ७.३० ते ११ गजानन विजय ग्रंथ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते २ भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ तसेच रात्री ८ ते १० कीर्तन सेवा असा भरगच्च धार्मिक कार्यक्रम आखण्यात आला आहे.

महोत्सवाच्या सातव्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या महोत्सवातून गर्दीचा नवा विक्रम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाविकांसाठी ग्रंथ स्टॉलचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या संपूर्ण महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन आयोजक प्रा. गणेश देशमुख (शिरसगाव) यांनी केले असून संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त होणाऱ्या या धार्मिक सोहळ्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!