नेवासा
वारकरी सांप्रदाय हा करमणूक, मनोरंजनासाठी नसून हरीकीर्तन, नामचिंतनाच्या माध्यमातून भगवतप्राप्ती करण्याचे साधन आहे. मात्र लोक किर्तनकारांकडून हसवण्याची करमणुकीची अपेक्षा करत आहे. त्यामुळे कुठलेही वारकरी शिक्षण नसलेले स्वयंघोषित किर्तनकार सध्या सांप्रदायाला बदनाम करण्याचे काम करत असल्याची सडेतोड टिका प्रसिध्द कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केली.
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे आयोजित गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त ४ थे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राजश्रीताई घुले, मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष उदयन गडाख, जिल्हा बँक व्यवस्थापक रावसाहेब वर्षे, कार्यक्रमाचे आयोजक प्रा. गणेश देशमुख यांनी महाराजांचे पूजन केले.
‘घडो त्यांचा समागम ! ज्यांचे प्रेम विठ्ठले’ या अभंगाचे निरुपण करताना पाटील महाराज म्हणाले, महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या मातीत वारकरी सांप्रदाय हे एकमेव व्यासपीठ आहे. इथे कुणाची दिशाभूल केली जात नाही. वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ आहे. मोठमोठे किर्तनकार ज्ञानदानाचे कार्य करत आहे. मात्र काही लोक वारकरी सांप्रदायाला कलंक लावण्याचे काम करत आहे. याला जबाबदार तुम्ही लोक असल्याचे सांगताना ते म्हणाले, वारकरी सांप्रदाय हा करमणूक, मनोरंजनासाठी नसून हरीकीर्तन, नामचिंतनाच्या माध्यमातून भगवतप्राप्ती करण्याचे साधन आहे. मात्र लोक किर्तनकारांकडून हसवण्याची करमणुकीची अपेक्षा करत आहे. त्यामुळे कुठलेही वारकरी शिक्षण नसलेले स्वयंघोषित किर्तनकार सध्या सांप्रदायाला बदनाम करण्याचे काम करत असल्याची सडेतोड टिका
त्यांनी यावेळी केली. पूर्वजन्मीचे पुण्य असल्याशिवाय परमार्थाची आवड निर्माण होत नाही व भंगवंताविषयी
प्रेम निर्माण होत नाही आणि पुण्य पदरी पडण्यासाठीच संत व देवाचे उत्सव साजरे करावे लागतात. संत शरीर समाज पैशावर प्रेम करत नाही. इच्छेच्या पलिकडे त्यांच वैराग्य असल्यानेच ते संत झाले. दुसऱ्याच्या चुका ते पदरात घेताना अंतःकरण मोठ करतात म्हणून ते संत झाले.
भरत खंडात राजे खूप झाले मात्र
महाराष्ट्राचे दैवत फक्त छत्रपती शिवाजी महाराज झाले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. चांगली संगत चांगल्या श्रवणाने परमार्थ दृढ होतो व देवाविषयी शुध्द सात्विक भाव निर्माण होतो. तरुणांच्या वाढत्या व्यसनाबद्दल खंत व्यक्त करत व्यसनापासून दूर राहून आई-वडिलांची सेवा करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तर हा चालू असलेला महोत्सव व शिरसगावचे भक्तीमय वातावरण पाहुन चंद्रभागेच्या वाळवंटात सोहळा सुरु असल्यासारखे वाटते असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी किशोर महाराज दिवटे, उद्धव महाराज शिंदे, सुदाम महाराज शास्त्री, गणेशानंदगिरी महाराज, जिल्हा बँक व्यवस्थापक रावसाहेब वर्षे, रविंद्र मोटे, कल्याणराव म्हस्के तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


