भेंडा/नेवासा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष असताना त्यांनी कबड्डी खेळाला बळ देण्याचे काम केले. कबड्डी असोसिएशनने ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गावागावातून कबड्डी स्पर्धा घ्याव्यात असे आवाहन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा जिजामाता महाविद्यालयाच्या इंडोअर स्टेडियम मध्ये अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिजामाता महाविद्यालय व रणविर क्रीडा मंडळ भेंडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१० मार्च रोजी आयोजित केलेल्या ८५ किलो वजन गटातील मॅटवरील जिल्हा पुरुष संघाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन श्री घुले यांचे हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव प्रा. शशिकांत गाडे, खजिनदार प्रकाश बोरुडे, सदस्य शंतनु पांडव, संचालक अशोकराव मिसाळ,जनरल मॅनेजर रवींद्र मोटे,कामगार।संचालक सुखदेव फुलारी, प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे,शरद आरगडे, वैभव नवले,प्रा.दत्ता वाकचौरे, सोपान महापुर, बंडू भागवत, परसराम नाकडे, शंकर गदाई, संतोष औताडे, रघुनाथ मोहरकर आदी यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेमधून निवडलेले संघ दि. २५ ते २९ मार्च २०२६ रोजी सिन्नर नाशिक येथे होणाऱ्या ७३ वी वरीष्ठ गट पुरुष राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.


