नेवासा/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक नेते अब्दुलभैय्या शेख यांनी केली आहे.
निषेध व्यक्त करताना श्री.शेख म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु कोणत्याही महिला नेत्याबाबत अवमानकारक, अपमानास्पद किंवा अशोभनीय भाषा वापरणे हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारे आहे.
राजकीय टीका ही धोरणे, भूमिका आणि विचारांपुरती मर्यादित असावी. वैयक्तिक पातळीवर किंवा महिलांचा अवमान करणारी भाषा वापरणे हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे केवळ संबंधित व्यक्तीचाच नव्हे, तर संपूर्ण महिला वर्गाचा अपमान होतो. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखणे ही सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी आहे.
काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्यांचा राजीनामा घेवून अशा प्रकारच्या वक्तव्यांना पक्षाकडून पाठबळ दिले जात नसल्याचा स्पष्ट संदेश जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महिलांच्या सन्मानाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींचा अपमान हा आम्ही सहन करणार नाही. संबंधितांवर योग्य कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर लोकशाही आणि संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल तसेच अशा वक्तव्यांना जशास तसे उत्तर देईल.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही सुसंवाद, परस्पर आदर आणि सभ्यतेवर आधारित आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकमेकांबाबत बोलताना संयम बाळगावा, महिलांचा सन्मान राखावा आणि राजकारणातील सभ्यता टिकवून ठेवावी, असे आवाहन श्री.शेख यांनी केले.


