Monday, August 24, 2026

आ.विठ्ठलराव लंघे पाटील हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे सर्वसमावेशक नेतृत्व-केंद्रीय मंत्री रामदास आठवले

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील हे सर्व जाती-धर्मातील नागरिकांना विश्वासात घेऊन, सर्वांना सोबत घेऊन चालणारे सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वाला आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचीही भक्कम साथ असून नेवासा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे श्रीरामपूरकडे जात असताना सोमवार, दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता नेवासा फाटा येथील आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आ. विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री आठवले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, “आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांची कार्यपद्धती सर्वसमावेशक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्रित करून मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य देणारे त्यांचे नेतृत्व आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या सोबत असून त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला आणखी भक्कम ताकद मिळाली आहे.”

देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार प्रभावीपणे काम करीत असून महाराष्ट्रातही महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची वाटचाल सुरू आहे. महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने साथ देत आहेत, असेही केंद्रीय मंत्री आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री आठवले यांच्या या सदिच्छा भेटीदरम्यान आ. विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी त्यांच्याशी नेवासा विधानसभा मतदारसंघासह विविध सामाजिक व विकासात्मक विषयांवर चर्चा केली. विशेषतः समाजातील वंचित, दुर्बल व मागास घटकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा अधिकाधिक लाभ नेवासा तालुक्याला मिळावा, तसेच विविध विकासकामांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार्य मिळावे, यासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले,शिवसेनेचे नेते,भाऊसाहेब वाघ, रिपाईचे नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे, शहराध्यक्ष पप्पू इंगळे,जेष्ठ राजेंद्र वाघमारे, चंद्रकांत करडक, राम केंदळे, सुनील वाघमारे, अरुणराव मिसाळ, दयानंद खिलारी, सुरेशराव गायकवाड, संजय बनसोडे, नितीन भालेराव, विजय राजगुरू, नगरसेवक महेश लोखंडे, संदीप सरकाळे, प्रवीण सरोदे, अंकुश म्हस्के, निरंजन डहाळे, कृष्णा परदेशी,संतोष मोरे, अशोक राजगुरू, संदीप चाबुकस्वार, नितीन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या या भेटीमुळे नेवासा फाटा येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विविध राजकीय व सामाजिक घटकांना सोबत घेऊन मतदारसंघाच्या विकासासाठी काम करण्याच्या आ. विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या सर्वसमावेशक भूमिकेला केंद्रीय मंत्री आठवले यांनी दिलेली दाद विशेष लक्षवेधी ठरली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!