Wednesday, September 16, 2026

ऊस गाळप हंगामपूर्व बैठक तातडीने घ्या;ऑक्टोबरमध्ये ऊस गाळप नको-अभिजित पोटे यांची मागणी

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

यंदाच्या २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मागील हंगामातील त्रुटी, ऊस दरातील अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ऊस गाळप हंगामपूर्व बैठक तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी भेंडा येथील शिवसैनिक तथा ऊस उत्पादक शेतकरी प्रतिनिधी अभिजित पोटे यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात श्री.पोटे यांनी म्हटले आहे की, २०२३ च्या ऊस गाळप हंगामात श्रीगोंदा येथील कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याने जास्तीचा ऊसदर सांगून शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेला. त्यानंतर जप्तीची कारवाई झाल्यावर केवळ एफआरपीप्रमाणे पैसे देण्यात आल्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ७११ रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचा आरोप पोटे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना
हंगामपूर्व बैठकीस बोलावून योग्य ती चर्चा करून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

२०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामात काही कारखान्यांनी साखर उतारा कमी दाखवून ऊसदर कमी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. साखर उताऱ्यातील तांत्रिक त्रुटी आणि त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान, या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय वाघ उपस्थित होते.

*ऑक्टोबरमध्ये गाळप नको…

यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने ऊस पिकाची अपेक्षित वाढ झालेली नाही. ऑक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू केल्यास साखर उतारा कमी होऊन शेतकऱ्यांना कमी ऊसदर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळप हंगाम नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरमध्ये सुरू करण्यात यावा, अशी मागणी अभिजीत पोटे यांनी केली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!