पुणे/प्रतिनिधी
ऊस व साखरेची उत्पादकता वाढविण्यासाठी व्हिएसआयकडून ‘ऊस शेती ‘ज्ञानयाग’ व ‘ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटचे (व्हिएसआय)महासंचालक यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना पाठिविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, महाराष्ट्रात ऊसाची व साखरेची उत्पादकता वाढविण्यासाठी ऊस शेतीबाबत आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्याचा बापर प्रत्यक्ष शेतीमध्ये होणे, ही काळाची गरज आहे. या उद्देशाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे मागील ३७ वर्षापासून उस उत्पादक पुरूष शेतकऱ्यांसाठी ‘ऊल शेती ज्ञानयाग’ आणि ऊस उत्पादक महिला शेतकऱ्यांसाठी मागील २२ वर्षापासून ऊस शेती ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या प्रशिक्षणास लाभणारा मोठा प्रतिसाद लक्षात घेता आणि त्याची व्याप्ती वाढावी म्हणून मागील १२ वर्षापासून दोन टप्प्यात प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत.
यावर्षी,माहे डिसेंबर २०२६ या महिन्यात हे घेण्यात येणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तसेच विदर्भ विभागातील कारखान्यांचे पुरुष शेतकऱ्यांकरिता दि.०१ ते ०४ डिसेंबर २०२६ या कालावधीत,
सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील कारखान्यांचे पुरूष शेतकऱ्यांकरिता दि. ८ ते ११ डिसेंबर २०२६ या कालावधित
तर सोलापूर जिल्ह्यातील तसेच मराठवाडा आणि खानदेश विभागातील कारखान्यांचे पुरूष शेतकऱ्यांकरिता
दि.१५ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधित ‘ऊस शेती ज्ञानयाग’ प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे.
तसेच महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने व इतर राज्यातील सदस्य कारखाने यांच्या महिला शेतकऱ्यांसाठी दि. २१ ते २४ डिसेंबर २०१६ या कालावधित उस शेती ज्ञानलक्ष्मी’ या प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे.
‘ऊस शेती ज्ञानयाग’ आणि ‘उस शेती ज्ञानलक्ष्मी’ या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आज अखेर ३२ हजार ०४४ शेतकरी प्रशिक्षित झालेले आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमात ऊस शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलेले आहे, तसेच प्रशिक्षित शेतकऱ्यांनी ऊस शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बापर करून ऊसाचे दर हेक्टरी उत्पादकता वाढविलेली आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींची राहण्याची व जेवणाची सोय संस्थेच्या वसतीगृहात केली जाते, तसेच प्रशिक्षण साहित्य म्हणून त्यांना बॅग, पुस्तिका, टोपी, पेन व पॅड देखील पुरविले जाते. समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थीना प्रशस्तीपत्रक आणि सामुहिक फोटोची प्रत देवून गौरविण्यात येते.
तरी आपण कृपया आपल्या साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक पुरुष व महिला शेतकऱ्यांना बरील कालावधीत प्रशिक्षणासाठी पाठवून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. प्रशिक्षणार्थीनी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मांजरी येथील संस्थेच्या वसतीगृहामध्ये मुक्कामास पाठवावे. प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीस ४ हजार रुपये याप्रमाणे फी आकारण्यात येईल. यात महिला प्रशिक्षणार्थीच्या सोबत येणाऱ्या अन्य व्यक्तींचा समावेश नसून त्यांचे बरोबर अन्य व्यक्ती आल्यास त्यांना प्रतिदिन ४०० रुपये प्रमाणे वेगळा आकार द्यावा लागेल. तसेच प्रशिक्षणार्थीच्या बरोबर येणाऱ्या वाहन चालकांनाही प्रति दिन ४०० रुपये प्रमाणे वेगळा आकार दयावा लागेल, प्रशिक्षणार्थीच्या नावाची यादी व त्याचे शुल्क २५ नोव्हेंबर २०२६ पुर्वी पाठवावेत असे ही सूचित केले आहे.


