नेवासा/प्रतिनिधी
वांबोरी चारीतून आजवर पाण्यापासून वंचित राहिलेल्या नेवासा तालुक्यातील गावांना पिण्यासाठी तसेच शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व आमदार विठ्ठलभाऊ लंघे यांच्या सहकार्याने आता गती मिळत असल्याची माहिती शिवसेना युवा नेते अभिजीत पोटे यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई,राजेगाव, मांडेगव्हाण, मोरगव्हाण, वाघवाडी, लोहगाव आणि झापवाडी या गावांना पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शिवसेना युवा नेते अभिजीत पोटे, मेजर महादेव आव्हाड व संजय वाघ हे सातत्याने पाठपुरावा करित आहेत. या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी वांबोरी चारी तसेच मुळा उच्चस्तरीय पाईपलाईन कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनस्तरावर मांडण्यात आली आहे. श्री.पोटे यांनी दि.२४ सप्टेंबर २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सविस्तर निवेदन देऊन या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
या निवेदनात नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई, राजेगाव, मोरगव्हाण, मांडेगव्हाण, वाघवाडी, झापवाडी, लोहगाव तसेच अहिल्यानगर तालुक्यातील पांगारमल या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.
बांबोरी उच्चस्तरीय पाईपलाईन कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही गावांना पाणीपुरवठ्याची सुविधा मिळाली; मात्र काही गावे अद्यापही पाण्यापासून वंचित आहेत. ही गावे कमी पर्जन्यछायेच्या क्षेत्रात येत असल्याने पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर बनतो. अनेक नागरिकांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे या गावांचा योजनेत समावेश करून पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या सोबतच वाघवाडी येथील मंजूर तलाव क्रमांक ३८ व ३९ यांना पाणीपुरवठा करणारी वारंवार फुटणारी नादुरुस्त पाईपलाईन नव्याने टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे. सदर पाईपलाईन एमआयडीसी परिसरातून जात असल्याने औद्योगिक बांधकामांमुळे ती वारंवार खराब होत आहे. यापूर्वी दोन वेळा दुरुस्ती करूनही पाईपलाईन फुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे वाघवाडी गावाच्या दक्षिण भागातून जाणाऱ्या बांबोरी उच्चस्तरीय पाईपलाईन कालव्याला सरळ रेषेत जोडून नवीन पाईपलाईन टाकावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांसाठी अभिजीत पोटे यांनी २०१९ आणि २०२० पासूनच पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दि.४ सप्टेंबर २०१९ रोजी नेवासा तालुक्यातील पांढरी पूल चौक येथे भव्य रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. तसेच दि. १९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून संबंधित गावांतील नागरिकांचा पाणीप्रश्न पुन्हा शासनासमोर मांडण्यात आला होता.
*वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश…
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून संबंधित प्रकरणी शासनाच्या प्रचलित नियमांनुसार उचित कार्यवाही करावी आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ शासनास सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.
*सात गावांच्या पाणीप्रश्नावर आता ठोस निर्णयाची अपेक्षा….
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सहकार्याने आणि अभिजीत पोटे यांच्या विशेष प्रयत्नांतून वंचित गावांच्या पाणीप्रश्नावर प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या राजेगाव, मांडेगव्हाण, मोरगव्हाण, शिंगवे तुकाई, वाघवाडी, लोहगाव आणि झापवाडी येथील ग्रामस्थांना आता प्रत्यक्ष पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. केवळ कागदोपत्री कार्यवाही न राहता या गावांना पिण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


