स्थापना दिन विशेष…
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची ८८ वर्षाची यशस्वी वाटचाल
२२ नोव्हेबर १९३८ रोजी तत्कालीन पोदार मिल कंपनीने दिलेल्या जागेत मुंबईतील डिलाईल रोड (ना.म.जोशी मार्ग) येथे देशातील पहिल्या कामगार कल्याण केंद्राची स्थापना झाली. तिथून सुरू झालेला हा प्रवास आज ८८ वर्षांनंतरही अविरतपणे सुरू असून, हे मंडळ राज्यातील लाखो कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी एक भक्कम आधारवड ठरले आहे.
मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार १ जुलै १९५३ रोजी या मंडळाला वैधानिक स्वरूप मिळाले आणि पुढे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर याचे नाव ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ’ (MLWB) असे करण्यात आले.
या ऐतिहासिक व यशस्वी वाटचालीचे प्रमुख टप्पे आणि वैशिष्ट्ये म्हणजे…
१) कामगार कल्याणाचा पाया आणि विस्तार….
*ऐतिहासिक सुरुवात:– सन १९३८ मध्ये कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी अवघ्या एका केंद्रापासून या उपक्रमाची सुरुवात झाली.
*त्रिपक्षीय रचना:— मंडळाचे कामकाज सरकार, मालक (नियोक्ता) आणि कामगार यांच्या त्रिपक्षीय अंशदानातून (Contribution) चालते, ज्यामुळे कामगारांच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षण अत्यंत पारदर्शक पद्धतीने होते.
*भव्य जाळे:— आज राज्यातील हजारो कारखाने, औद्योगिक व व्यापारी आस्थापना, बँका आणि त्यातील ५० लाखांपेक्षा जास्त कामगार व कर्मचारी या मंडळाशी जोडले गेले आहेत.
२)शैक्षणिक क्रांती आणि शिष्यवृत्ती योजना…
मंडळाने कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत:
*उच्च शिक्षण व परदेशी शिष्यवृत्ती:– कामगारांच्या गुणवंत मुलांना परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रतिवर्ष ५०.हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाते.
*स्पर्धा परीक्षा सहाय्य:– UPSC आणि MPSC सारख्या कठीण परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती (UPSC साठी
८,००० रुपये देऊन प्रोत्साहन दिले जाते.
*संगणक व कौशल्य विकास:– आधुनिक काळाची गरज ओळखून MS-CIT आणि GCC-TBC सारख्या व्यावसायिक कोर्सेससाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
*पाठ्यपुस्तक सहाय्य:—कामगारांच्या मुलांना मोफत किंवा सवलतीच्या दरात पाठ्यपुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य केले जाते.
३)आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा..
कामगार आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मंडळाने नेहमीच तत्परता दाखवली आहे.
*गंभीर आजार उपचार निधी:– कर्करोग, हृदयरोग किंवा किडनीचे आजार यांसारख्या गंभीर आजारांच्या उपचारासाठी मंडळाकडून ₹५,००० ते ₹२५,००० पर्यंतची थेट वैद्यकीय मदत दिली जाते.
*महिला सक्षमीकरण: —कामगार महिला व कामगारांच्या पत्नींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन अनुदान योजना चालवली जाते.
४) क्रीडा, संस्कृती आणि कला गुणांना वाव ….
“शिस्त, सेवा, सुधार, समृद्धी” हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या या मंडळाने कामगारांच्या अंगभूत कलागुणांना नेहमीच व्यासपीठ दिले आहे.
*नाट्य आणि भजनी स्पर्धा:— राज्यस्तरीय भजनी स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, आणि कामगार नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून औद्योगिक जगतात सांस्कृतिक चैतन्य टिकवून ठेवण्याचे काम मंडळाने केले आहे.
*क्रीडा शिष्यवृत्ती:— खेळाडू पाल्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी विशेष क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते.
५) कामगार सन्मान (पुरस्कार)…
कामगार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि कारखान्यांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगारांचा सन्मान करण्यासाठी मंडळातर्फे दरवर्षी
गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार,
कामगार भूषण पुरस्कार,नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार हे प्रतिष्ठित पुरस्कार दिले जातात.
६)आधुनिकतेची कास,डिजिटल कामगार कल्याण:— ८८ वर्षांच्या या दीर्घ प्रवासात मंडळाने काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये अमूलाग्र बदल केले आहेत. आज मंडळाचे संपूर्ण कामकाज डिजिटल व ऑनलाईन झाले आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल (MLWB) द्वारे आता आस्थापना नोंदणी, अंशदान भरणे आणि विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज थेट ऑनलाईन पद्धतीने
घेण्यात येत होते.परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या ‘जीपीआर’ प्रणाली अंतर्गत महामंडळाचे संपूर्ण कामकाज महाडीबीटी/आपले सरकार/मैत्री इत्यादी पोर्टलवर घेण्यात आले आहे.
गेल्या ८८ वर्षांत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने केवळ कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या कष्टकरी कामगाराला समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले आहे. ही ८८ वर्षांची वाटचाल म्हणजे श्रमिकांच्या कल्याणाचा आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचा एक सुवर्णकाळ आहे.
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री अड.आकाश फुंडकर, राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती.आय.ए. कुंदन(आयएस) व कामगार तथा कामगार कल्याण मंडळाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे।राज्यातील २ लाख ७५ हजार आस्थापनांमधील कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. राज्यात एकूण २०८ कामगार कल्याण केंद्र कार्यरत आहेत.
-नंदलाल राठोड
कल्याण आयुक्त
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,मुंबई
लेखक-सुखदेव एकनाथ फुलारी
(विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार-२०२४) कामगार संचालक, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ली.
मो.नं.९४२३७४९२७५
ईमेल- fularisukhdev@gmail.com


