मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील चारही कृषि विद्यापीठातंर्गतच्या कृषि व कृषि संलग्न महाविद्यालयातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधेचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे.
याबाबद महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने दि.२० नोव्हेबर रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हंटले आहे की,बसामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा यांचा लाभ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अनुज्ञेय करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) तथा अध्यक्ष, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमिती यांच्या अध्यक्षतेखाली, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत, इतर मागास प्रवर्गास असलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा अधिकचे शिक्षण शुल्क मराठा विद्यार्थ्यांकडून न घेणेबाबत तसेच, सदर शिक्षण शुल्क न भरल्यामुळे प्रवेश प्रक्रियेस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता घेणेबाबत, सर्व संबंधित विभागांनी आपल्या अधिनस्त शिक्षण संस्था, महाविद्यालये यांना आवश्यक त्या सूचना-निर्देश देण्याबाबत तसेच, सदर निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षण संस्था-महाविद्यालये यांच्याविरूध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुषंगाने, राज्यातील चारही कृषि विद्यापीठातंर्गतच्या कृषि व कृषि संलग्न महाविद्यालयातील, इतर मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेले, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या प्रवेश पुस्तिकेत नमूद करण्यात आलेले प्रवेश शुल्क, विद्यापीठ विद्यार्थी सहाय्य निधी-कल्याण निधी, कॉलेज मॅगेजीन फी, विद्यापीठ विद्यार्थी विमा निधी, ग्रंथालय शुल्क,विद्यापीठ अश्वमेध निधी, जिमखाना शुल्क, नोंदणी शुल्क, विद्यापीठ वैद्यकीय मदत निधी, विद्यार्थी ओळखपत्र शुल्क हे इतर शुल्क, यांचा लाभ मराठा समाजाच्या पात्र विद्यार्थ्यांना देखील अनुज्ञेय करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
सदर लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देय करण्याकरिता काटेकोरपणे निकषांची तपासणी करुन, अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता सर्व विद्यापीठांनी घ्यावी. तसेच, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी याबाबत आवश्यक समन्वय करावा असे नमूद करण्यात आले आहे.


