माय महाराष्ट्र न्यूज: केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेबद्दल तपशील हळूहळू पुढे येत आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेमध्ये लाभार्थ्यांना आपल्या घरांच्या
छतांवर सोलर पॅनल लावण्यासाठी अनुदान मिळणार आहे.एक रुपयाही खर्च न करता छतांवर वीजनिर्मिती करता येणार आहे.केंद्रीय ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी लोकांना घरावर
सोलर पॅनल बसवण्यासाठी ४० टक्के सबसिडी मिळत होती. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत ६० टक्के सबसिडी मिळणार आहे. बाकी ४० टक्के रक्कम कर्ज स्वरुपात घेऊ शकता येईल.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी
सरकार प्रयत्नशील आहे. केंद्राने एक कोटी घरांच्या छतांवर या योजनेंतर्गत सोलर पॅनल बसवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारने सबसिडी वाढवली, त्याचं कारण जास्तीत जास्त लोक कर्जाशिवाय या योजनेचा लाभ घेतील. ज्यांच्या घराचं वीजबिल ३०० युनिटपेक्षा कमी आहे,
अशांसाठी ही योजना लाभदायी ठरणार असून सरकारही या लाभार्थ्यांना लाभ देणार आहे.सदरील योजनेंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांवर कसलाही दबाव असणार नाही. योजना लागू करण्यासाठी केंद्राच्या वतीने प्रत्येक राज्यासाठी एसपीव्ही बनवली जाईल.
६० टक्के सबसिडीशिवाय ४० टक्के एसपीव्हीतून कर्ज मिळणार आहे. छतावर निर्माण होणारी अतिरिक्त वीज एसपीव्हीच्या माध्यमातून खरेदी केली जाणार आहे. त्यातूनत लाभार्थी कर्ज फेडू शकतो.अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनानंतर पंतप्रधान
मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला, त्यामध्ये त्यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची माहिती दिली. यासाठी तब्बल १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
या योजनेच्या माध्यमातून लोकांना वर्षाला १५ ते १८ हजार रुपयांपर्यंत बचत होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं.