माय महाराष्ट्र न्यूज: कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतो, त्यावर लोकसभेचे जागावाटप करण्यात येते. आम्हाला विजयाची खात्री असल्याने आम्ही शिर्डीच्या जागेसाठी आग्रही आहोत.
आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय चर्चेअंती होईल, असे विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत आमदार थोरात यांनी आज पत्रकार
परिषदेत विस्तृत भूमिका मांडली. अॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सहभागी झाले असले, तरी त्यांनी मांडलेल्या किमान समान कार्यक्रमावर एकत्र येऊन चर्चा करू आणि मग जनतेला आश्वासित करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे, असे सांगून सरकारवर टीका करताना आमदार थोरात म्हणाले, की कांद्याची निर्यातबंदी केल्याने भाव मिळत नाही. कापूस, सोयाबीनचेही दर पडले आहेत.
शेतकर्यांसाठी प्रचंड अडचणीचा काळ आहे. टँकरची संख्या वाढत आहे. कायद्याचा धाक राहिला नाही. तीन महत्त्वाकांक्षी लोकांनी एकत्र येऊन सरकार निर्माण केले. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्यासाठी स्पर्धा लागली आहे.
त्यांचा मेळ घालण्यातच वेळ जात आहे. राज्यकर्तेच गुन्हेगार होतात, त्यामुळे राज्यात अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.काँग्रेसला दोन मोठे नेते सोडून गेल्याबाबत विचारले असता थोरात म्हणाले, की झाडाला कायम नवीन पलवी फुटते.
देवरा आणि सिद्दिकी म्हणजे काँग्रेस नाही. जनता आमच्याबरोबर आहे. राजकारण हा माणसाच्या मनाचा खेळ आहे. येणार्या निवडणुकीत कळेल, जनता कोणाच्या बरोबर आहे ते.माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर
भाजपमध्ये स्पष्ट बोलणारा चांगला नेता म्हणजे नितीन गडकरी, असे सांगून थोरात म्हणाले, की पक्षबदलावर गडकरी यांची टिप्पणी चांगली आहे. ते म्हणतात- आम्ही आंदोलने केली, लाठ्याकाठ्या खाल्ल्या; पण पक्ष कधीच सोडला नाही. आता कोणी कुठेही उड्या मारत आहे.
मतमोजणी प्रक्रियेवर कॅमेर्याचे लक्ष असतानाही मतपत्रिका बदलल्या जातात, तर मग गोपनीय मतपेटीचे काय होत असेल? त्यामुळे आतापर्यंत नाही, पण आता मनात ‘ईव्हीएम’बद्दल शंका निर्माण झाली आहे.