नेवासा
विद्यार्थ्यांमध्ये कठोर परिश्रम मेहनत करण्याची तयारी नियमित अभ्यास जिद्द व चिकाटी असेल तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष गणेश गव्हाणे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनी कु.जान्हवी कर्डिले हिची सहाय्यक संशोधन अधिकारी वर्ग-२ आणि गोरक्षनाथ गोयकर याची कामगार तलाठी पदावर स्पर्धा परीक्षेतून निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थी संघाचे वतीने आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरुन श्री.गव्हाणे बोलत होते. प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे,नामदेव निकम,बाबासाहेब गव्हाणे,नामदेव शिंदे,प्रा.डॉ.रामदास आर्ले,माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रा.केशव चेके यांचेसह विद्यार्थी,शिक्षक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
कु.जान्हवी कर्डिले म्हणाली, जिद्द,मेहनत,चिकाटी आणि आत्मविश्वास या चतुसूत्रीच्या जोरावर आपण स्पर्धा परीक्षेत नक्कीच यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतांनाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करावी असा सल्ला तीने दिला.
मॉडर्न कॉलेज पुणे येथील डॉ. स्नेहल गागरे यांनी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या विषयावर व्याख्यान दिले. प्रा. डॉ अशोक सागडे यांनी सूत्रसंचालन केले.