माय महाराष्ट्र न्यूज:मराठा आरक्षणासंबंधी काढण्यात आलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करून तातडीने अंमलबजावणी सुरू करावी,
या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथ पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने बुधवारी (१४ फेब्रुवारी) संपूर्ण
महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत असल्याची माहिती स्थानिक संयोजकांनी दिली.अहमदनगरच्या
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला या आंदोलनाची पत्राद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत
उपोषण सुरु केले आहे. सर्वसामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करीत आहे. सरकारला पुरेसा वेळ देऊनही सरकार वेळ काढूपणा करत आहे. उपोषणामुळे
जर जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाला तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी.जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण
महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत आहे, असे निवेदन देण्यात आले आहे. यावर गजेंद्र दांगट, मदन आढाव,
राम जरांगे, स्वप्नील दगडे, विक्रांत दिघे, प्रमोद कोरडे, बलराज आठरे, विलास तळेकर, अमोल हुबेपाटील, गोरख दळवी, शशिकांत भांबरे, संदीप जगताप यांच्या सह्या आहेत.