माय महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात मोठा डाव टाकला आहे. आता, सुनिल
तटकरेंविरुद्ध त्यांच्या भावाला लढवण्याची योजना शरद पवार गटाकडून आखली जात आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी रायगड लोकसभा
मतदारसंघात सुनिल तटकरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या तटकरेंविरुद्ध कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने
सुनिल तटकरेंच्या भावाला पक्षात मोठी जबाबदारी दिली आहे.माजी आमदार अनिल तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर,
आता अनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे, रायगड आणि श्रीवर्धनमध्ये खा. सुनिल तटकरेंना मात देण्यासाठी
पवारांची ही खेळी असावी, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने अनिल दत्तात्रय तटकरे यांची पक्षाच्या
‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे, असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे. त्यासोबत, अनिल देशमुख यांना जंयत पाटील व राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पत्र देण्यात येत असल्याचा फोटोही शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, खासदार सुनील तटकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तटकरे यांना मात देण्यासाठी शरद पवार यांनी माजी आमदार अनिल तटकरे यांच्या माध्यमातून
रायगड आणि श्रीवर्धनमध्ये तयारी सुरू केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनिल तटकरे अशीही चर्चा आहे.दरम्यान, तटकरे कुटुंबीयांमध्ये २०१९ पासून मतभेद निर्माण झाले आहेत.
तत्पूर्वी शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यात तडजोड झाली होती. मात्र, ती जास्त काळ टिकली नाही. अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरे यांना डावलून २०१९ मध्ये सुनील तटकरे यांनी आपली मुलगी आदिती तटकरे
यांना श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले होते. तेव्हापासून तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होते. त्यामुळे, विधानसभा २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार अनिल तटकरे आणि त्यांचे
चिरंजीव तत्कालीन आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता, त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.