माय महाराष्ट्र न्यूज: राज्यात सध्या संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे. तर, तापमानात वाढ झाली असल्याने दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा आहे.
गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरीही लावली होती. तसंच काही ठिकाणी गारपीटही झाली होती. आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात पुन्हा पाऊस हजेरी लावणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मात्र, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अंदाज नाही. मात्र, विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्यानं फेब्रवारी महिन्याचा शेवट पावसानेच होणार आहे.
25 आणि 26 फेब्रुवारीला विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल, असा अंदाज वेध शाळेनं वर्तवला आहे. सध्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असून उकाडा वाढू लागला
असला तरी महिन्याच्या अखेरीस मात्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असतानाच आता बळीराजावर पुन्हा एकदा पावसाचं संकट आहे.
पश्चिम हिमालयीन भागात सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे उत्तरेत येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हिमवृष्टी होण्याचाही
अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील चार दिवस हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.