माय महाराष्ट्र न्यूज:: तुम्ही रात्रीच्या अंधारात अनेक वेळा पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. तुम्ही कोणत्या पक्षनिष्ठेच्या गप्पा मारताय? आपल्याच दिव्याखाली अंधार असेल तर दुसऱ्यांच्या
पंचायती करणे बंद करा. तुम्ही रात्री कोणाचे पाय धरता हे मला खाजगीत विचारा, मी तुम्हाला सांगेन, अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
यांना टोला लगावला. थोरातांच्याच बालेकिल्ल्यात तुफान फटकेबाजी करत विखेंनी पुन्हा डिवचलं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप
सुरू असतात. त्यामुळे विखे पाटलांच्या संगमनेर दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरात विविध
विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. गेल्या वर्षभरापासून मागणी असलेल्या संगमनेर शहरातील माळुंगी नदीवरील पुलाचे भूमिपूजन विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी शिंदे गटाचे खा. सदाशिव लोखंडेंसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमच्यावर पक्ष बदलण्याची टीका काँग्रेसचे मित्र करतात पण आम्ही जे करतो ते डंके की चोट पर जाहीरपणे करतो. १९८५ साली बाळासाहेब विखे काँग्रेसकडून खासदारकीला उभे असताना तुम्ही तुमच्या
मेहुण्याच्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे काम केलं. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शकुंतला थोरात यांच्या विरोधात उमेदवारी करत घोडा चिन्ह घेतलं व तुम्ही काँग्रेसलाच घोडा लावला. तुमचा मेव्हणा (डॉ. सुधीर तांबे ) नाशिक पदवीधर मध्ये
उभा राहिला त्यावेळी काँग्रेसच्या विरोधात त्यांना अपक्ष म्हणून निवडून आणलं. हे सगळ चालतं अंधारात. यावेळी भाचे ( सत्यजित तांबे ) निवडणुकीत उभे राहिले आम्ही निवडून आणलं त्यांना. तुमचा
महाविकास आघाडीचा उमेदवार होता आणि तुम्ही हात बांधून बसला होतात. हात बांधले होते तोंड नव्हतं बांधला ना? त्यावेळी मी काँग्रेसचा निष्ठावान सैनिक आहे, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत द्या हे का नाही सांगितलं? असा प्रश्न विखेंनी विचारला.
गेले काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, आता त्यांच्या फ्लेक्सवरून सोनिया व राहुल गांधी देखील
गायब झाल्याचे दिसून येत आहे. कोणत्या दिशेला ते चालले हे समजत नाही. आमच्याकडे तर आता हाऊसफुल झालंय. खासदार लोखंडे यांच्या पक्षात जात असतील तर त्यांनाच माहीत अशा शब्दात महसूल मंत्री विखे पाटीलांनी थोरात यांना टोला लगावला.