माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव-चांदा रस्त्यावर असलेल्या शेतीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढताना एका मजूरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोनई पोलिस ठाण्याच्या समोर नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या दोनशे ग्रामस्थांनी ठिय्या अंदोलन केले.यानंतर पोलिसांनी संबंधित विहिर मालकांवर गुन्हा दाखल केला.
घोडेगाव-जुना चांदा रस्त्याच्या शिवारात घोडेगाव येथील अशोक नहार यांचे शेत आहे. विहिरीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढण्यासाठी शिवा एकनाथ सावंत (वय-२६)यास आणण्यात आले.तो हे काम करण्यासाठी विहिरीत उतरला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मालकाने त्याची कुठलीही खबरदारी घेतली नव्हती. असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
ही घटना मंगळवारी दि.१५ जून रोजी सकाळी घडली.सोनई पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.विहिर मालकावर गुन्हा दाखल केला तरच मृतदेह ताब्यात घेवू असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.
आज सकाळी नाथपंथी समाज संघटनेचे पदाधिकारी पिराजी शिंदे, भाऊराव शेगर, दया सावंत,बाबा शिंदे, मोहन शेगर,बाबा शेगर,शिवराम सावंत,
विठ्ठल शेगर,अनिल सावंत सह दोनशे जणांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या अंदोलनास बसले होते.मृत्युमुखी पडलेल्या सावंत यांची घरची परिस्थिती अतिशय गरीबीची आहे.त्यास तीन लहान मुले असून संपुर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असल्याने सर्व समाज एकत्र आल्याचे पिराजी शिंदे यांनी सांगितले.
पोलिसांनी अशोक नहार,अजय नहार,अभय नहार व त्यांच्या एका नोकरावर गुन्हा दाखल केला.सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.