माय महाराष्ट्र न्यूज:आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांनी होऊ शकते. पुढील महिन्याच्या मध्यावर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी माहिती
सूत्रांनी दिली आहे. यातच भाजप पुढील आठवड्यात गुरुवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते.एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भाजपच्या
पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसारख्या दिग्गज भाजप नेत्यांची नावे असू शकतात.भाजप आपल्या पहिल्या यादीत सुमारे 100 उमेदवारांची
नावे जाहीर करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसीचे खासदार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमधील गांधीनगरमधून खासदार आहेत. पुढील आठवड्यात गुरुवारी
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, त्यात उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे, असं माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीनंतर भाजप त्याच दिवशी उमेदवारांची पहिली यादी जाहीर
करू शकते. या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा भाजपचा दावा आहे. तर भाजपने 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.यातच एनडीएला टक्कर
देण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. अलीकडेच बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी यांच्या आरएलडीने
इंडिया आघाडीची साथ सोडली. ते आता एनडीएमध्ये सामील झाले आहेत.दरम्यान, दिल्ली, गोवा, हरियाणा, गुजरात इत्यादी ठिकाणी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये युती झाली आहे.
तर यूपीमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राबाबत अजूनही चर्चा सुरू आहे.