माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी साडेसात हजार मेट्रिक टन खत उपलब्ध होणार असून नेवासा तालुक्यातील शेतकर्यांना युरिया खताची टंचाई भासू नये यासाठी 484 टन युरिया खत उपलब्ध केले जाणार आहे.
याबाबत काल बुधवारी राज्याचे जलसंधारणमंत्री ना. शंकराव गडाख यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून चर्चा केली. त्यावेळी खत उपलब्ध करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांनी काल (बुधवारी) नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून नेवासा तालुक्यास पुरवठा करण्यात आलेल्या एकूण खतामधून जो 691 मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक केलेला आहे .
त्यातील 70 टक्के म्हणजे 483.70 मेट्रिक टन युरीया खत शेतकर्यांची खरीप हंगामातील पिकासाठी असलेली मागणी विचारात घेऊन तालुक्यातील परवानाधारक खत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली. त्यामुळे नेवासा तालुक्यासाठी 483.70 मेट्रिक टन युरिया खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
कृषिमंत्री ना. दादाजी भुसे व ना. शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासा तालुक्यासाठी आत्तापर्यंत पुरवठा झालेल्या 2076 मेट्रिक टन युरिया खतापैकी तालुक्यात युरीया खताची मोठी टंचाई असताना मुळा बाजार मार्फत सोनई व नेवासा येथून 130 मेट्रिक टन युरीया खताची 939 शेतकर्यांना विक्री करण्यात आली.
जिल्ह्यातील खताची टंचाई लक्षात घेऊन नामदार शंकरराव गडाख यांनी काल बुधवारी आरसीएफ, नर्मदा व जीएसएफसी या प्रमुख खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सविस्तर चर्चा केली.
त्यानंतर संबंधित कंपन्यांनी येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यासाठी 7 हजार 500 मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्यांचा खताचा प्रश्न सुटणार असल्याचे नामदार गडाख यांनी सांगितले.