माय महाराष्ट्र न्यूज:देशात सध्या चर्चेत असणारा एकमेव मुद्दा म्हणजे, लोकसभा निवडणूक. संपूर्ण देशच आगामी निवडणुकीच्या चर्चांमध्ये रमलेला असताना याच देशातील नागरिकांना
केंद्रस्थानी ठेवत सरकारच्या वतीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून या निर्णयाचा फायदा नागरिकांना घेता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयानुसार आता कोविड
काळापूर्वी असणारे रेल्वे तिकीटांचे दर पुन्हा लागू करण्यात येणार आहेत. थोडक्यात रेल्वे प्रवाशांना आता तिकीटामध्ये थेट 50 टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. रेल्वेच्या तिकीट दरातील कपात करण्याच्या
निर्णयाचा सर्वाधिक फायदा पॅसेंजर ट्रेननं प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना होणार आहे. कोविड काळादरम्यान रेल्वे विभागाच्या वतीनं तिकीट दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठीच हा निर्णय
घेण्यात आला होता. पण, आता मात्र ही दरवाढ मागे घेण्यात आला आहे. ज्यामुळं आता अनेकजण अर्ध्या तिकीटातच रेल्वे प्रवास करु शकणार आहेत. प्रसिद्ध वृत्तसमुहाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला सर्व एमईएनयू रेल्वेच्या तिकीटा
दरांमध्ये 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. कोविड काळामध्ये गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुढं लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रेल्वे विभागाच्या वतीनं पॅसेंजर रेल्वे गाड्यांची विभागणी
करत त्याच्या तिकीटाची रक्कम एक्स्प्रेस ट्रेनशी जोडली. थोडक्यात प्रवाशांना पॅसेंजर रेल्वेसाठीही एक्स्प्रेसचं तिकीट भाडं भरावं लागत होतं. दर दिवशी प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसत होता. अखेर रेल्वेनं
प्रवाशांना दिलासा देणारा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. जिथं पॅसेंजर रेल्वेसाठी आता Second Class चा तिकीट दर लागू करण्यात आला आहे. रेल्वेच्या तिकीट आरक्षण प्रणालीमध्येही हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळं तुम्हीही
आता एखाद्या पॅसेंजर ट्रेननं प्रवास करण्याच्या विचारात असाल तर सर्वप्रथम तिकीटाचे नवे दर पाहून घ्या आणि त्यात बदल झाला नसल्यास यंत्रणांना सूचित करा. रेल्वे विभाग इथं तुम्हाला सहकार्य करणार आहे.