माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या तीन ते चार तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आले आहे. तसेच पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही
भागांत देखील पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.आज (१ मार्च) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गडगडाटी वादळासह पुढील ३-४ तासांत धुळे, जळगाव, नाशिक,
नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असा इशारा भारतीय हवामान
विभाग मुंबई (IMD Mumbai) कडून देण्यात आला आहे. आयएमडी पुणे प्रमुख आणि शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत ढगांच्या गडगटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबत काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने
वर्तवली आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर,
नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, सातारा, जालना, ठाणे रायगड आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
पुढील तीन ते चार दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाडा, विदर्भातील काही भागांत वीजांसह पाऊस होऊ शकतो.