माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून
मराठा आरक्षणावरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षण प्रकरणात अनेक वर्षांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सुप्रीम कोर्टात सध्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी
सध्या पार पडत आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी 10 टक्क्यांचं आरक्षण नुकतंच जाहीर
केलं आहे. विधीमंडळाच्या सभागृहात ते मान्यही झालं आहे. त्यामुळे मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मराठा समाजाला
ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान मराठा समन्वयक आणि मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करणारे
याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केला आहे.राज्यात आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. निवडणूक आयोगाकडून
पुढच्या 10 ते 15 दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्ष लोकसभेची तयारी करत आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात विविध मतदारसंघांसाठी उमेदवार ठरवले जात आहेत.
असं असताना आता मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यात सध्याच्या घडीला मराठा समाज एकवटलेला बघायला मिळतोय.
त्यामुळे त्याचा फायदा कदाचित विनोद पाटील यांना होण्याची शक्यता आहे.आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवणार असल्याचं विनोद पाटील यांनी जाहीर केलंय. मराठा समाजाने आयोजित
केलेल्या सत्कार समारंभात त्यांनी याबाबत घोषणा केली. विनोद पाटील यांनी आग्र्यात शिवजयंती साजरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमातच कार्यकर्त्यांनी
लोकसभा निवडणुक लढवण्याचा आग्रह धरला होता. लोकांच्या आग्रहाखातर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं विनोद पाटील यांनी स्पष्ट केलं.