अहमदनगर दि. 2 मार्च
ग्रंथाचा प्रचार, प्रसार करण्याबरोबर वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी जिल्हा ग्रंथालयामार्फत आयोजित करण्यात आलेला ग्रंथोत्सव हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. नागरिकांनी अधिकाधिक ग्रंथाची खरेदी करण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
उच्च तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबाासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या अहमदनगर ग्रंथोत्सवाचे उदघाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, प्रभारी ग्रंथालय संचालक तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर, समिती सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे, अहमदनगर जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक, ज्येष्ठ साहित्यिक मेधाताई काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष किशोर मरकड, अविनाश येवले, एन.बी. धुमाळ, छत्रपती संभाजीनगरचे सहायक संचालक सुनील हुसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
*डॉ.संजय कळमकर:– ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर म्हणाले की, मानवी जीवनामध्ये निस्वार्थी आणि अत्यंत चांगला मित्र म्हणजे पुस्तक आहे. एकाच छताखाली अनेक दर्जेदार पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या व मोबाईलच्या युगामध्ये वाचनसंस्कृती अधिक टिकावी, विद्यार्थ्यांसह नागरिकांना वाचनाची सवय लागावी यासाठी शासनामार्फत अशा प्रकारच्या कार्यक्रमातुन प्रयत्न करण्यात येत आहेत. वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथोत्सव हा केवळ उपक्रम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षाही श्री कळमकर यांनी यावेळी व्यक्त केली.
*डॉ.रवींद्र ठाकुर:– जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात तरुणाईचा समाजमाध्यमांकडे अधिक कल असल्याचे दिसुन येतो. परंतू वाचनामुळेच माणुस समृद्ध होत असल्याने वाचनाची सवय प्रत्येकाने अंगीकारावी. या ग्रंथोत्सवामध्ये अनेक दर्जेदार पुस्तके उपलब्ध असुन वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी प्रत्येकाने पाच व्यक्तींना ग्रंथ खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करुन एक साखळी निर्माण करुन पुस्तके वाचनाचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
*अशोक गाडेकर:– प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, ग्रंथाचा प्रचार, प्रसार तसेच वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी संपुर्ण राज्यात शासनातर्फे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचकांना एकाच छताखाली अनेक लेखकांची दर्जेदार व उत्कृष्ट अशी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली असुन याचा जिल्ह्यातील प्रत्येकाने लाभ घेत वाचनसंस्कृती वाढीसाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात साहित्यिक व वाचकांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती स्वाती हुबे व सहायक संचालक सुनील हुसे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन तसेच राज्यगीताने करण्यात आली.
कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, साहित्यिक तसेच वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या दोन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रमात राज्यभरातील विविध प्रकाशन संस्था सहभागी झाल्या आहेत. दि. 2 व 3 मार्च, 2024 रोजी पुस्तकांचे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. वाचक, रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हा ग्रंथालयाने आवाहन केले आहे.
*ग्रंथदिंडी संपन्न*
अहमदनगर ग्रंथोत्सव 2023 निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, राधाकिसन देवढे यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. रेणाविकर माध्यमिक विदयालय, सावेडी येथून सुरु झालेली ही ग्रंथदिंडी सावेडी नाका मार्गे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवन, सावेडी येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनींसह, साहित्यिक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.