माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागील महिनाभरात बैठका घेऊन जागा वाटप निश्चित केलेल्या आढाव्याचा अहवाल तिन्ही पक्षांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला आहे.
तिन्ही पक्षांनी स्वतंत्र अहवाल दिले असले तरी राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) ११, कॉँग्रेस १५ आणि २२ जागा शिवसेना ठाकरे गटाने लढवाव्यात यावर एकमत झाले आहे. या जागांमधूनच वंचित
बहुजन पक्षाला चार जागा देण्याची तयारी आघाडीने दाखवली आहे. तसेच अजून काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची राष्ट्रवादी कॉँग्रेस
पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बैठक सहा मार्चला मुंबईत होत आहे.
या बैठकीत ज्या जागांवर एकमत झालेले नाही, ज्या जागा अदलाबदली करावयाच्या आहेत आणि वंचितला द्यावयाच्या जागा यावर चर्चा होणार आहे. ही बैठक येत्या आठवड्यातच होणार आहे. यासाठीचा
अहवाल प्रत्येक पक्षाने स्वतंत्र दिला आहे. ज्यामध्ये वारंवार बैठका घेऊनही मार्ग निघाला नाही, अशा प्रश्नांवर वरिष्ठांनी निर्णय घ्यावा, असे ठरले आहे.या बैठकीत प्रमुख चर्चा वंचितच्या जागा वाटपावर होणार आहे.
वंचितला महाविकास आघाडीकडून सहा जागा हव्या आहेत, अशी चर्चा असली तरी अद्याप त्यांनी तशी मागणी केलेली नाही. महाविकास आघाडीने ‘वंचित’साठी अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य
मुंबई आणि मराठवाड्यातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र त्याबदल्यात या तिन्ही जागांमध्ये आपापसात दोन तीन जागांवर अदलाबदली होणार आहे.
मुंबईतील वायव्य आणि उत्तर मुंबई मतदार संघावर पण कॉँग्रेसने दावा केला होता. मात्र आता उत्तर मुंबई मतदारसंघ कॉँग्रेस लढवणार आहे. तर वायव्य मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे.
विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांना याच मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.