पाथर्डी
मोहटा देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या विरोधात देवस्थान ट्रस्टच्य कामगारांनी बंड पुकारले असून दि.१३ मार्च पासून देवस्थानच्या मुख्य द्वारावर हे कर्मचारी बेमुदत आमरण उपोषण करण्याच्या हत्यार उपसले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुख्य अधिकारी व कामगार यांच्यातला संघर्ष अधिक पेटणार असून यावर देवस्थान ट्रस्ट सह प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या उपोषणा बाबत लाल बावटा जनरल कामगार युनियनने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून निवेदन दिले आहे. मोहटा देवस्थानकडे मानधन तत्वावर काम करणाऱ्या काही कामगारांना गेली दहा-बारा वर्ष येथे काम करून झाले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कामगारांच्या तक्रारी बद्दल कार्यवाही व्हावी यासाठी १३ मार्च पासून कर्मचारी यांचे बेमुदत आमरण उपोषण केले जाणार आहे. यापूर्वी जवळपास ५७ कर्मचाऱ्यांनी देवस्थानचे तत्कालीन चेअरमन अशोककुमार भिल्लारे यांना देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विषयी विविध तक्रारी अर्ज दिले होते.अर्जाचा विचार करून त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. चौकशी समितीने कामगारांच्या तक्रारी बाबत चौकशी करून लेखी तक्रार अर्ज समितीने घेतलेले आहेत. ही चौकशी होऊन ४ वर्षाचा कालावधी होऊनही अद्याप पर्यंत कोणत्या प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली आम्हाला समजलं नाही.
यापूर्वी श्री.जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटेचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश यांना पत्राद्वारे संघटने पत्र व्यवहार केलेला आहे.कर्मचाऱ्यांनी चौकशी मध्ये तक्रारी लेखी दिल्या असून त्या फार तीव्र स्वरूपाचे आहे.त्या भावनेचा विचार करणे गरजेचे आहे. कर्मचान्यांचा वापर स्वतःच्या स्वार्थापोटी केलेला आहे. कामगारांच्या तक्रारी आहेत. ते सर्व विश्वस्त समितीला कळवणे आवश्यक आहे. परंतु सध्या ते होत नाही. त्यामुळे देवस्थानच्या कामगारांच्या भविष्याचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. यापूर्वी देवस्थानचे चेअरमन व त्रिसदस्य विश्वस्त समिती यांना कर्मचाऱ्यांमार्फत व संघटनेमार्फत वेळोवेळी विनंती अर्ज केलेले आहेत व पत्राचे स्मरण दिले आहे.संस्थांनकडे याविषयी चौकशी अहवाल अद्याप पर्यंत उघड झालेला नाही. याचे कारण कामगारास आजपर्यंत समजलेले नाही?
तक्रारीला ४ वर्षे पूर्ण होऊनही कामगारांना त्रास व पिळवणूक चालू असून त्यावर समिती काही निर्णय घेणार आहे का नाही हा प्रश्न कामगारांना व संघटनेला पडलेला आहे? त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय अपेक्षित आहे व अहवाल उघड करुन पुढील कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दिलेल्या वेळेत आम्ही सर्व कर्मचारी बेमुदत आमरण उपोषण करणार आहे.याची चौकशी समितीच्या अहवालाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.